मुंबई- स्वयं पुनर्विकास चळवळीत अनेक अडचणी आल्या. मात्र त्या अडचणींचा निपटारा करण्याचे काम राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वयं पुनर्विकासाचे जाळे मुंबईतच नाही तर आज महाराष्ट्रभर पसरत असून ही चळवळ प्रामाणिक भावनेतून निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे. मुंबई बँकेच्या आर्थिक साहाय्याने कांदिवली (पूर्व) येथील स्वयंभू को-ऑप. हौसिंग सोसायटीचे भूमिपूजन आ. प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी स्थानिक आमदार अतुल भातखळकर, भाजपा मंडळ अध्यक्ष आप्पा बेळवळकर, उदय दळवी, हर्षद मोरे, यतीन नाईक, जितेंद्र शोरप, प्रकाश मुसाळे, सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पाध्ये, कार्यवाह मिलिंद तेंडुलकर, खजिनदार महादेव बापट यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
दरेकर म्हणाले कि, स्वयं पुनर्विकासाच्या ज्या कार्यक्रमांना मी जातो त्या ठिकाणी कौटुंबिक स्वरूपच दिसते. आजपर्यंत मी ३०-४० भूमिपूने केली असतील, १५ इमारती उभ्या राहिल्या आहेत. घरातला जसा सण, उत्सव असतो तसे वातावरण मी सर्व कार्यक्रमांना पाहिलेय व त्यातील उत्तम अशा प्रकारचे कौटुंबिक वातावरण आज स्वयंभुच्या भूमिपूजन सोहळ्यात पाहायला मिळतेय. स्वयं पुनर्विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असेल तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. ही चळवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रभर पसरत असल्याचेही दरेकरांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले कि, आता आम्ही जे प्रकल्प केले त्यातील हा छोटा आणि सगळ्यात उत्तम प्रकल्प आहे. स्वयं पुनर्विकास एवढ्यासाठी आणला कि जो सर्वसामान्य, मध्यम वर्गीय माणूस आहे त्याच्या जीवावर विकासक नफा कमावणार तो नफा सभासदांना दिला गेला तर जागाही मोठी मिळेल, कॉर्पसही मिळेल आणि तशा प्रकारचे काम सुरू झालेय. आज स्वयंभूचे भूमिपूजन झालेय. १४ कोटी रूपये या संस्थेला बँकेच्या मार्फत देण्यात आलेत. फडणवीस यांनी चावी वाटप केल्यानंतर स्वयं पुनर्विकासाचे प्रस्ताव वाढले आहेत. स्वयं पुनर्विकासाचे वारे ठाणे, पनवेल, पुणे, नाशिकमध्ये गेलेय. प्रामाणिक भावनेने ही चळवळ उभी केली असल्याचेही दरेकर म्हणाले. तसेच स्वयं पुनर्विकास चळवळ आज गतीने पुढे जातेय. चांगल्या संस्कारीत अशा स्वयंभू इमारतीचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाल्याबाबत दरेकर यांनी आभारही व्यक्त केले.