मुंबई बँकेचे अध्यक्ष व आ.प्रविण दरेकर उपस्थित राहणार
मुंबई- मुंबईतील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अनेक अडचणींमुळे रखडत आहे. या पार्श्वभूमीवर हाऊसिंग सोसायट्यांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य देण्याच्या हेतूने मुंबई जिल्हा सहकारी बँकेने ‘स्वयंपुनर्विकास कर्ज योजना’ राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांचा पुनर्विकास स्वतः करणे शक्य झाले आहे. या यशस्वी अनुभवांच्या पार्श्वभूमीवर आपला रुपेश फाउंडेशन व मुंबई जिल्हा बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार, ३१ मे रोजी सकाळी १० वाजता डोंगरी येथील सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कूल सभागृहात स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात दक्षिण मुंबईतील उमरखाडी, डोंगरी, चिंचबंदर परिसरातील म्हाडाच्या, खाजगी मालकीच्या धोकादायक, पागडी व बीपीटी इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने यशस्वीपणे पुनर्विकास पूर्ण केलेल्या प्रकल्पांचा लेखाजोखा शिबिरात सादर केला जाईल. तसेच पुनर्विकासाच्या कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन, स्वयंपुनर्विकासासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती, यशस्वी प्रकल्पांचे प्रातिनिधिक उदाहरण आणि मुंबई जिल्हा बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज सवलती व अटी याबाबतही शिबिरात माहिती दिली जाणार आहे. या मार्गदर्शन शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आपला रुपेश फाउंडेशनचे अध्यक्ष रुपेश पाटील, मुंबई सहकारी बोर्डाचे सहसचिव श्रीधर जगताप यांनी केले आहे.