मुंबई – राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने जनतेच्या सूचनांचा अंतर्भाव करून तयार केलेला अहवाल सोमवार १४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता विधान भवन येथील मुख्यमंत्री समिती कक्ष येथे शासनास सादर केला जाणार आहे, अशी माहिती स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष आणि निमंत्रक आ. प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख मान्यवर म्हणून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर सांस्कृतिक माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार व गृहनिर्माण राज्य मंत्री पंकज भोयर हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित असणार असल्याचे निमंत्रक आ. प्रविण दरेकर यांनी सांगितले आहे.