मुंबई(प्रमोद देठे) : मुंबई महानगरपालिका निवडणूक म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर विभागाच्या भविष्यासाठीचा निर्णय असल्याचे प्रतिपादन करत संतोष सुरेश राणे यांनी प्रभाग क्रमांक २१० मधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपब्लिकन सेना यांच्या महायुतीचे ते अधिकृत उमेदवार आहेत.
माझगाव ताडवाडी येथील बी.आय.टी. चाळीत जन्मलेले राणे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे. विद्यार्थी जीवनातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९९० साली त्यांनी सार्वजनिक कार्यास सुरुवात केली. गेली ३५ वर्षे भायखळा विभागात जनतेच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
यशस्वी उद्योजक म्हणून काम करत असताना युवकांसाठी रोजगारनिर्मिती, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य व रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण यांसारखे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
निवडून आल्यास रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी वाचनालये, क्रीडा मैदाने, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी व इमारतींचा पुनर्विकास तसेच सीसीटीव्हीद्वारे सुरक्षितता या बाबींवर विशेष भर देणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे.
“सत्य, पारदर्शकता आणि लोकहित हेच माझ्या राजकारणाचे अधिष्ठान आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व समाजघटकांसाठी प्रामाणिकपणे काम करीन,” असा विश्वास व्यक्त करत येत्या १५ जानेवारी रोजी ‘कमळ’ चिन्हाला मतदान करून विकासाला साथ द्या, असे आवाहन संतोष राणे यांनी मतदारांना केले आहे.