■ प्रतिनिधी, मुंबई – उबाठा गटाच्या उपनेत्या व प्रवक्त्या सौ. संजना घाडी आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या एका विशेष कार्यक्रमात पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या वेळी युवासेना विस्तारक सुयश घाडी, उपशाखाप्रमुख सागर पांचाळ, उपशाखाप्रमुख नितेश माने, समीर बोरकर, युवासेना मागाठाणे विधानसभा चिटणीस प्रदीप नेगी, युवासेना शाखा अधिकारी तानाजी जाधव, आशिष गावडे, मोहम्मद सय्यद यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी झाले.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “गेल्या अडीच वर्षांत आम्ही कोणत्याही टिकेला प्रत्युत्तर न देता केवळ कामावर भर दिला आहे. मुंबईत कोस्टल रोड, एमटीएचएल, मेट्रो प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे दवाखाने, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डीप क्लिन ड्राइव्ह आदी कामे जलद गतीने सुरू आहेत. महायुतीतील तिन्ही पक्ष एक टीम म्हणून लोकहिताचे कार्य करत आहेत आणि तेच पुढेही सुरू राहील.”
पक्षप्रवेशानंतर संजना घाडी यांना शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या म्हणून दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा फायदा पक्षाला मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला नेत्या मीनाताई कांबळी, सचिव संजय मोरे, माजी नगरसेविका राजुल पटेल, विभागप्रमुख स्वप्नील टेंभुलकर तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.