मिरा-भाईंदर, २७ मार्च : राज्य आणि केंद्र शासनाच्या येणाऱ्या विविध अभियानांची प्रभावी अंमलबजावणी, सीएसआरच्या माध्यमातून निधी संकलन व विविध उपक्रमांसाठी धोरणात्मक तयारी या उद्देशाने मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या तत्कालिन आयुक्तांनी स्थापन केलेल्या नाविन्यता कक्षाचा नुकताच नव्याने नियुक्त झालेल्या आयुक्त तथा प्रशासक मा. राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांनी आढावा घेतला.
महानगरपालिकेच्या आस्थापनेवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने शासनाच्या विविध उपक्रमांसाठी स्वतंत्र सल्लागार नेमून कामांची तयारी, पाठपुरावा व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यासाठी नाविन्यता कक्ष ही संकल्पना राबवण्यात आली. ई-निविदा प्रक्रियेद्वारे सीईजीपी या संस्थेला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले.
या कक्षामार्फत स्वच्छ भारत मिशन, माझी वसुंधरा, जलशक्ती अभियान, मिशन लाईफ, पेयजल सर्वेक्षण, सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज यांसारख्या केंद्र शासन पुरस्कृत उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी झाली. याशिवाय, फराळ सखी, ई-ऑफिस, ई-हजेरी, डिजिटल कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत, हरित कचऱ्यापासून उत्पन्न, रविवार उद्यान, होम @ 20, फ्लड फ्री सिटी, स्किल सेंटर, एम्प्लॉएब्लिटी@ 18, कॅम्पस प्लेसमेंट @ एमबीएमसी, मिरा भाईंदर @ 2047 व सीएसआर कॉन्क्लेव्हसह विविध धोरणे तयार करण्यात आली.
नाविन्यता कक्षाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांनी नाविन्यता कक्षाचा आढावा घेत सद्यस्थितीत अति आवश्यकता नसलेल्या तसेच प्रकल्प पूर्ण झालेल्या ११ सल्लागारांना कमी करण्यात येत आहे.