दोन महिन्यात प्लास्टिक व दुर्गंधीमुक्त जिल्हा करण्याचा निर्धार
■ प्रतिनिधी, पालघर दि. २९ मार्च: पालघर जिल्ह्याला सायबर गुन्ह्यांपासून मुक्त करण्याच्या संकल्पानंतर आता प्लास्टिकमुक्त आणि दुर्गंधीमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यात प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्लास्टिक निर्मूलनाच्या कामात अपयशी ठरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे शासकीय अनुदान रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
जनता दरबारात महत्त्वाचे निर्णय
पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर गणेश नाईक यांनी दुसऱ्या जनता दरबाराचे आयोजन जिल्हा नियोजन भवनात केले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग व ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात स्वच्छता राखण्यासाठी आणि परिसर दुर्गंधीमुक्त करण्यासाठी ‘पालघर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त जिल्हा अभियान’ सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी पुढील दोन महिन्यांत केली जाईल.
स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि दुर्गंधी रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आदेश देताना पालकमंत्री नाईक यांनी पावसाचे पाणी आणि सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी ग्रामपंचायतींना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच, दुर्गंधी कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी केळीच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याचा सल्लाही दिला.
जिल्ह्यात ५००० सुरंगीच्या झाडांची लागवड
सुरंगी या वृक्षाच्या फुलांमुळे परिसर सुगंधित आणि आनंददायक होतो. तळ कोकणात या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. त्याच धर्तीवर, पालघर जिल्ह्यातही किमान ५००० सुरंगीची झाडे लावण्याचा निर्णय घेतल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केले. वन विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाईल.
पालघर जिल्हा नशामुक्त करण्यासाठी कडक पावले
पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील वाढती व्यसनाधीनता आणि अमली पदार्थांचे सेवन यावरही गंभीर चिंता व्यक्त केली. महाविद्यालयीन युवकच नव्हे, तर शालेय विद्यार्थीही सिगारेट आणि अमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहेत, हे थांबवण्यासाठी त्यांनी जिल्ह्यात नशामुक्ती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला.
पोलीस अधीक्षकांना आदेश देताना, “शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर पोलिसांनी छापे टाकावेत आणि जिल्ह्याला पुढील दोन महिन्यांत नशामुक्त करावे,” असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, कोणत्याही गुन्हेगाराला वरिष्ठांची शिफारस लागू नये, “जर कोणी शिफारस घेऊन आला, तर त्याला माझ्याशी बोलण्यास सांगा,” असा स्पष्ट इशारा गणेश नाईक यांनी दिला.
पालघर जिल्हा स्वच्छ, प्लास्टिकमुक्त व नशामुक्त करण्याचा संकल्प
पालघर जिल्ह्यात स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन आणि नशामुक्ती यांसाठी प्रशासनाने कडक उपाययोजना राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. आगामी दोन महिन्यांत या मोहिमांचा ठोस परिणाम दिसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.