मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्लीचा ‘मुंबईचा राजा’ यंदा भक्तांच्या दर्शनासाठी रामेश्वरम मंदिराच्या भव्य प्रतिकृतीसह साकारण्यात येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाने तामिळनाडूमधील ऐतिहासिक आणि पुरातन रामेश्वरम मंदिरावर आधारित देखावा उभारण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भातील एक झलक दाखवणारा व्हिडिओ मंडळाच्या सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
गणेश गल्ली मुंबईचा राजा मंडळ यंदा आपला ९८वा वर्ष साजरा करत आहे. शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असलेले हे मंडळ दरवर्षी भव्य आणि दिमाखदार देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. यंदाच्या देखाव्यासाठी प्रसिद्ध कला दिग्दर्शक कुणाल साबळे आणि त्यांच्या टीमने तामिळनाडूतील रामेश्वरम मंदिराचा सखोल अभ्यास केला असून, मंदिराच्या वास्तुरचनेला न्याय देण्यासाठी टीम गेल्या काही महिन्यांपासून मेहनत घेत आहे.
रामेश्वरम मंदिर, ज्याला रामनाथस्वामी मंदिर असेही म्हटले जाते, हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, प्रभू श्रीराम यांनी लंकेवर विजय मिळवण्यापूर्वी येथे शिवपूजन केले होते. हनुमानाने येथेच लंकेहून शिवलिंग आणल्याचा पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे या मंदिराचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व फार मोठे आहे.
मुंबईतील लाखो गणेशभक्तांसाठी यंदाचा देखावा एक अद्वितीय आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव ठरणार आहे. गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’ यंदाही आपल्या दिमाखदार देखाव्यामुळे शहरात आकर्षणाचे केंद्र ठरणार हे निश्चित आहे.