मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्लास्टिक वापर विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दिनांक ०९ एप्रिल २०२५ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्लास्टिक वापर विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. आयुक्त यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक बॅग, आणि “सिंगल युज प्लास्टिक” विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून रु. २०,०००/- आणि अस्वच्छता केल्याबद्दल रु. १०००/- इतका दंड वसूल केला आहे.
महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग निर्णयानुसार आता महाराष्ट्र राज्यात एक वेळ वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिक (single use plastic) वापरावर बंदी आहे. शहरातील भाजी विक्रेते, दुकानदार शहरात सर्रास प्लास्टिक बॅग चा वापर करताना दिसून येतात. त्याचप्रमाणे “युज अँड थ्रो” च्या डब्या, प्लेट्स, ग्लासेस, शोभेच्या माळा, थर्माकोल, इत्यादी वापराच्या वस्तू सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रक्रिया प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात दररोज जमा होत आहेत. त्याठिकाणी मनुष्य बळ वापरून हे प्लास्टिक वेगळे करण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांच्या देखील आरोग्याचा आणि एकंदरीत या शहराच्या आरोग्याचा मोठा पर्यावरणीय प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन, स्वच्छता निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत लिपिक, मुकादम, फेरीवाला पथक कर्मचारी, भरारी पथक यांच्या सहकार्याने प्लास्टिक विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करून रु. २०,०००/- आणि अस्वच्छता केल्याबद्दल रु. १०००/- इतका दंड वसूल केला आहे. अंदाजे २५ किलो प्लास्टिक कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर करणारे विक्रेते व नागरिकांना पहिल्या वेळेस रु. 5000, दुसऱ्या वेळेस रु. 10,000 व तिसऱ्या वेळेस रु. 25,000 इतका दंड आकारून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. “सिंगल युज प्लास्टिक” च्या वापरावर महाराष्ट्र शासनमार्फत बंदी आहे तसेच यामुळे पर्यावरणाला देखील हानी पोहचत आहे म्हणूनच “सिंगल यूज प्लास्टिक” ची विक्री करणे तसेच वापर करणे शहरातील दुकानदार, फेरीवाले व नागरिकांनी टाळावे असे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या वतीने करण्यात येत आहे.