प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश दळवी यांचा शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश

 

मिरा-भाईंदर : काँग्रेसमध्ये तब्बल ४४ वर्षे निष्ठेने कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व प्रदेश प्रतिनिधी सुरेश दळवी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट)मध्ये प्रवेश केला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दळवी यांचा पक्षप्रवेश पार पडला.

सुरेश दळवी यांनी काँग्रेस पक्षात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी मिरा-भाईंदर युवक काँग्रेसचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आठ वर्षे सरचिटणीस व प्रवक्ता, मिरा-भाईंदर शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता म्हणून काम केले आहे. तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नऊ वर्षे सचिव आणि प्रदेश प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी जबाबदारीने कार्य केले आहे.

याशिवाय दळवी हे मराठा समाजाची प्रातिनिधिक संघटना असलेल्या मिरा-भाईंदर मराठा संघाचे गेल्या २५ वर्षांपासून अध्यक्ष आहेत.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली तसेच सुरू असलेली विकासकामे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे दळवी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या प्रवेशामुळे मिरा-भाईंदर परिसरातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *