मुंबई (प्रतिनिधी: योगेश पोवार) डोंगरी परिसरातील उमरखाडी नाका येथे मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. नजमबाग हॉलच्या गेटसमोरून रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचाऱ्याला भरधाव वेगाने येणाऱ्या टॅक्सीने जोरदार धडक दिली. या अचानक झालेल्या अपघातात संबंधित पादचारी गंभीर जखमी झाला असून, तो रस्त्यावरच कोसळला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र परिस्थितीची माहिती मिळताच शिवसेना मुंबादेवी विधानसभा क्षेत्राचे संघटक रूपेश पाटील यांनी तत्परता दाखवत आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता आपत्कालीन सेवांना संपर्क साधला आणि रुग्णवाहिका बोलावून जखमी व्यक्तीला तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल केलं.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जखमीची प्रकृती गंभीर असली तरी सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर उपचार करत आहे.
दरम्यान, अपघात घडवणारा टॅक्सीचालक हा अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी चालकाचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेवर अधिक लक्ष देण्याची मागणी केली आहे.
रूपेश पाटील यांच्या या तात्काळ हस्तक्षेपामुळे एक जीव वाचू शकला, याबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे आणि त्यांच्या टीमचे
कौतुक केले जात आहे.