पालघर दिनांक 2 : राज्यामध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असून पालघर जिल्ह्यामध्ये देखील काही रुग्ण आढळले आहेत या आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज रहावे असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
अवकाळी पावसामुळे नुकसानीचा आढावा. तसेच संभाव्य आपत्तीचा आढावा पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतला
यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल , खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित , जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक श्री . देशमुख , अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, जव्हार आणि डहाणूचे प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर , विशाल खत्री ,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी विजय जाधव , तेजस चव्हाण , आदी मान्यवर उपस्थित होते.
कोविड चा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करून घ्यावे , उपहारगृहामध्ये स्वच्छता ठेवून निर्जंतुकीकरण करावे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावे कोविडचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व अत्यावश्यक सुविधा सुरू कराव्यात नागरिकांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता नियमित हात स्वच्छ धुवावे तसेच निर्जंतूक करावे असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले
शाळा तसेच महाविद्यालयामध्ये उन्हाळी सुट्टी लवकरच संपणार आहेत. या सुट्ट्या संपण्याअगोदर शाळा महाविद्यालयामध्ये साफसफाई करावी. शेतकरी बांधवांनी बोगस बी – बियाणे खरेदी करू नये बोगस बी- बियाणे विक्री करणाऱ्या दुकानावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांना शासना मार्फत देण्यात येणाऱ्या बी- बियाणे व खते कमी पडणार नाहीत पिक विमा मिळणे हा प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क असून यामध्ये कोणी गैरप्रकार करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाचे कुपोषण मुक्त पालघर जिल्हा हे ध्येय असून हे ध्येय साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील कुपोषित बालकांना सशक्त आणि आरोग्य संपन्न करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
पाणी मिळणे हा सर्व नागरिकांचा मूलभूत हक्क असून प्रत्येक घरामध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. अवकाळी पावसामुळे घरे शेती बोटी मत्स्य उत्पादन इत्यादी बाबीचे नुकसान झाले आहे या सर्व नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे निधीची उपलब्धता होताच नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई चे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.