भाईंदर – बेकायदा इमारती उभारण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या वादग्रस्त उमरावसिंह ओस्तवाल (Ostwal Builder) याला अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या प्रकारामुळे शेकडो घर खरेदीदारांची फसवणूक झाली असून, त्यांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, ओस्तवालने पालिकेतील काही अधिकाऱ्यांची साथ घेऊन बनावट CC (Commencement Certificate) व OC (Occupation Certificate) तयार केले होते. बागेसाठी राखीव असलेल्या भूखंडांवरही बेकायदा इमारती उभारण्यात आल्या.
१४ पेक्षा अधिक गुन्हे नवघर, काशिमीरा, नयानगर आणि मीरा रोड पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवले गेले आहेत आणि गेल्या चार महिन्यांपासून ओस्तवाल फरार होता. त्याच्या अटकेनंतर मीरा-भाईंदरमधील बिल्डर लॉबीत एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त निकेत कौशिक, उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.