मुंबई (प्रविण वराडकर)-
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या गिरगावच्या राजाला यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी ८०० किलो वजनाचा भव्य दिव्य बेसनाचा मोदक अर्पण करण्यात आला आहे. हा मोदक फक्त आकारानेच नव्हे, तर चवीलाही तितकाच विशेष असून त्याची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ मध्ये झाली आहे. मालाडच्या प्रसिद्ध एम.एम. मिठाईवाले यांच्या विशेष स्वयंपाकींनी हा मोदक तयार केला असून, गणेश चतुर्थीच्या दिवशी तो मंडपात आणून श्रीगणेशाला अर्पण करण्यात आला. यानंतर हा मोदक प्रसादरूपाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये वाटला जात आहे.या ८०० किलो वजनाच्या मोदकासाठी जवळपास १००० किलो बेसन, ५० किलो तूप, ५० किलो साखर, १० किलो वेलची आणि विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरण्यात आले. मोदकासाठी लागणारे सर्व साहित्य फॉर्च्यून फूड्स यांनी पुरवले असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
यंदाचे वर्ष गिरगावच्या राजाचे ९८वे वर्ष असून, गेल्या नऊ दशकांपासून हे मंडळ शाडू मातीच्या मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवत आहे. या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका भाषणात घेतली होती.
गेल्या वर्षी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी या मंडळाला आमंत्रण मिळाल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.