पावसाळी पूर्व नालेसफाईत हलगर्जीपणा; ठेकेदारावर कारवाई करत १०% दंड आकारला

भाईंदर: (प्रतिनिधी) मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांना गती देण्यात आली असून, सदर काम दिनांक २० एप्रिल २०२५ पासून सुरू आहे. हे काम मे. आशापुरा कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेला देण्यात आले आहे. दिनांक २० मे २०२५ रोजी महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांनी शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून नालेसफाई कामाचा सखोल आढावा घेतला. यावेळी एम.एम.आर.डी.ए रोड, घोडबंदर उघाडी, महाजनवाडी, पेणकरपाडा, सृष्टी परिसर, अयप्पा मंदिर जवळील नाला आदी ठिकाणी त्यांनी सविस्तर निरीक्षण केले.

 

या पाहणीत नालेसफाईच्या कामात अपेक्षित गुणवत्ता व कार्यक्षमता दिसून आली नाही. अनेक ठिकाणी साचलेला गाळ पूर्णपणे काढण्यात आलेला नसल्याचे, तसेच मशिनरीचा पुरेसा आणि प्रभावी वापर न झाल्याचे निदर्शनास आले. या त्रुटी आणि कार्यातील हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मा. आयुक्तांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून मे. आशापुरा कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेवर पहिल्या देयक रकमेतून थेट १०% दंड आकारण्यात आला आहे. यासोबतच, भविष्यात अशा कामांमध्ये कोणतीही ढिलाई आढळल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, अश्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

 

शहरातील नालेसफाई कामे ही फक्त कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात परिणामकारक आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असावी, हीच महानगरपालिकेची भूमिका आहे, असे मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस प्राधान्य देऊन, पावसाळ्यापूर्वी सर्व नाले वेळेत आणि प्रभावीपणे स्वच्छ करण्यासाठी सज्ज असून, संबंधित विभागांना वेळेच्या चौकटीत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *