मुंबई: नागपूर ते नागभीड हा १०६ किलोमीटरचा नॅरो गेज लोहमार्ग ब्रॉड गेज मध्ये रुपांतरीत करण्याचे काम गतीने पूर्ण होत असुन, दिवाळीपूर्वी ईटावरी ते उमरेड या ५१ किमी मार्गाची लोकार्पण होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयात बोलावलेल्या महारेल कार्पोरेशनच्या कामाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला महारेल कार्पोरेशनचे उपाध्यक्ष जैस्वाल, परिवहन विभागाचे उपसचिव किरण होळकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले , नागपूर जवळील ईटावारी स्थानकापासून नागभीड पर्यंत सुमारे १०६ किलोमीटरचा नॅरो गेज लोहमार्ग ब्रॉड गेज मध्ये रूपांतरित करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश महारेल कार्पोरेशनला दिले आहेत. त्यापैकी ईटावरी ते उमरेड या ५१ किलोमीटरच्या लोहमार्गाचे लोकार्पण दिवाळीपूर्वी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. तथापि, या लोहमार्गाच्या नुतनीकरणामुळे १२-१४ छोट्या मोठ्या गावांना लोहमार्गाने नागपूर सारख्या महानगराशी जोडता येईल. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करा
सन. २०१६ मध्ये महाराष्ट्र शासन व केंद्रीय रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त भागीदारीतून महारेल कार्पोरेशन या संस्थेची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील ज्या रेल्वे प्रकल्पामध्ये राज्य शासन ची आर्थिक भागीदारी आहे, ते रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी महारेल कार्पोरेशन वर आहे. तसेच सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला ” रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र ” हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातील सर्व रेल्वे फाटका चे रूपांतर रेल्वे उड्डाणपूल मध्ये करण्याची मोठी जबाबदारी महारेल कार्पोरेशन वर टाकण्यात आली आहे. हे रेल्वे उड्डाणपूल देखील गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी महारेल कार्पोरेशनला दिल्या.