मुंबई- कांदिवली येथील दीडशे वर्ष जुने असलेले ताडकेश्वर मंदिर तोडण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली आहे. एवढ्या जुन्या मंदिराला नोटीस बजावण्याचे कारण काय? कोणतीही चर्चा, बैठक झाल्याशिवाय पालिकेने मंदिरावर तोडक कारवाई करू नये. शासनाने दीडशे वर्ष जुने मंदिर वाचवावे, अशी मागणी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे केली.
दरेकर म्हणाले कि, कांदिवली येथे दीडशे वर्ष जुने ताडकेश्वर मंदिर आहे. त्या ठिकाणी पालिकेने मंदिर तोडण्यासाठी नोटीस पाठवली आहे. मंदिराला जवळपास दीडशे वर्ष झाली आहेत. ८० वर्षाचे दुर्गादास म्हणून मंदिराचे पुजारी आहेत. विरेंद्र यातनिक, सुनिल सिंघल, शिवकुमार सिंघल, सुधीर शर्मा आदी लोकं या मंदिराचे कामकाज पाहतात. दीडशेच्या वर गाई आहेत. गोशाळा आहे. अचानक हे जुने मंदिर तोडण्याचे कारण काय? रोड जाण्याइतपत मोकळी जागाही तिकडे नाही. मंदिर समितीशी चर्चा, बैठक झाल्याशिवाय पालिकेने कोणतेही तोडकाम करू नये. दीडशे वर्षांपूर्वीचे मंदिर वाचवले जावे, अशी विनंती दरेकर यांनी शासनाकडे केली. दरम्यान, सभापती राम शिंदे यांनी याबाबत शासनाने लक्ष घालावे, असे निर्देश दिले.