मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच अन्य कोणत्याही प्रसारमाध्यमांतून निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी स्पष्ट माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत त्यांनी आदर्श आचारसंहितेतील या महत्त्वाच्या तरतुदींची माहिती दिली. प्रचार कालावधी संपल्यानंतर माध्यमांद्वारे होणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी नामनिर्देशन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मात्र, सूचक व अनुमोदक यांची नावे उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे, त्या प्रभागातील मतदार यादीत असणे बंधनकारक आहे.
राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार यांना प्रत्येकी एक सूचक आणि एक अनुमोदक आवश्यक असून उमेदवाराला एकापेक्षा अधिक प्रभागांतून नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. मात्र, एका प्रभागातील एका जागेसाठी उमेदवार जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करू शकतो, अशी माहितीही आयोगाकडून देण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.