मुंबई जिंकली! महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचा ‘वसंत स्मृती’त जल्लोष

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष दादर येथील भाजपच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयात जल्लोषात साजरा करण्यात आला. विजयाचा किल्ला फत्ते झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.


या सुवर्णक्षणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत जनसेवेची दिशा स्पष्ट केली. “मुंबईकरांनी दिलेला कौल हा विकास, सुरक्षितता आणि सुशासनाच्या बाजूने आहे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला. पुढील काळात मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती एकजुटीने काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप विधानपरिषद गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) प्रविण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर, संजय उपाध्याय यांच्यासह भाजपचे अन्य आमदार आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
“हा विजय केवळ निवडणुकीपुरता नाही, तर मुंबईच्या भविष्यासाठी जनतेने दिलेला विश्वास आहे,” असे यावेळी मान्यवरांनी स्पष्ट केले. या ऐतिहासिक यशानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाने कामाला लागण्याची ऊर्जा संचारलेली दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *