मुंबई दि. २९ मार्च : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-९ च्या चमूने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करत प्लास्टिकच्या झाडूच्या पोकळीत लपवलेले १० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणात पाच तस्करांना अटक करण्यात आली असून, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडसारख्या देशांत कुरियरच्या माध्यमातून ड्रग्ज पोहोचवणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला आहे.
‘ऑपरेशन एमडी’ची दमदार कारवाई
मुंबई गुन्हे शाखेच्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अतिशय शिताफीने बनावट ग्राहकाच्या मदतीने तस्करांना सापळ्यात अडकवले. प्लास्टिकच्या झाडूच्या दांड्यात लपवून ठेवलेल्या ‘म्याऊ म्याऊ’ कोडनेम असलेल्या ड्रग्जचा व्यवहार करण्याच्या तयारीत असलेल्या तस्करांना रंगेहाथ पकडण्यात आले.
तस्करीचा नवा फंडा:
तस्कर झाडूच्या पोकळ दांड्यात ड्रग्ज भरून ते कुरियरमार्फत वेगवेगळ्या देशांत पाठवत होते. चेन्नई आणि अन्य शहरांतून ड्रग्ज कुरियर करण्याची पद्धत त्यांनी अवलंबली होती. पोलिसांनी ५२ झाडू जप्त करत संपूर्ण टोळीचा छडा लावला.
पाच जण अटकेत, तपास सुरू
जहांगीर शहा आलम शेख आणि सेनोल जुलूम शेख यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तीन साथीदारांना—सुरेश कुमार नागराजन, अब्दुल मुनाब कलीम उर्फ युसूफ आणि मुरुसा कुलम याकूब अली उर्फ मुसा—अटक केली. पोलिसांचा तपास सुरू असून, या ड्रग्ज नेटवर्कचे आणखी धागेदोरे उकलण्याची शक्यता आहे.