मुंबई (सुधाकर नाडर) – मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबईचं चाक थांबवलं आहे. शहरातील रस्ते, हायवे पाण्याखाली गेले, लोकल रेल्वे उशिरा धावू लागल्या, विमानतळाकडे जाणारे मार्ग बंद झाले आणि हजारो प्रवासी अक्षरशः पाण्यात अडकून पडले. कामगार, कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी – सर्वच वर्ग त्रस्त झाला.
गेल्या दोन दिवसांत मुंबईतील 90 टक्के दुकाने, हॉटेल्स व रेस्टॉरंट्स बंद पडली. शाळांना सक्तीची सुट्टी द्यावी लागली. उपनगरांमधून रोज मुंबईत नोकरीसाठी येणारे लाखो प्रवासी त्रस्त होऊन, बंद कार्यालये आणि पाण्याने व्यापलेल्या रस्त्यांतून कसेबसे घरी परतले.
आता मुंबईकरांचा थेट सवाल आहे – या गोंधळासाठी जबाबदार कोण? मुंबई महापालिका (BMC) का?
दरवर्षी नालेसफाईसाठी, गटार स्वच्छतेसाठी, मिठी नदीच्या खोलीकरणासाठी बीएमसी हजारो कोटी रुपये खर्च करते, असा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात प्रत्येक पावसाळ्यात तीच कहाणी – रस्ते जलमय, रेल्वे ठप्प आणि नागरिकांचा प्रचंड त्रास.
नागरिकांचा आरोप आहे की, मुंबई महानगरपालिकेच्या सफाई व्यवस्थेत मोठा भ्रष्टाचार आहे. “फक्त २५ ते ३० टक्के कामगारच काम करतात, बाकी फक्त सही करतात आणि पगाराचा हिस्सा वरच्या अधिकाऱ्यांना जातो. ही भ्रष्ट ‘सिस्टम’ गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे,” अशीच नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे.
“मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आहे, एखादं खेडं नाही. प्रत्येक रस्त्यावर नाले, मॅनहोल्स आहेत. सफाईचे काम प्रामाणिकपणे झाले असते तर एवढं पाणी साचलं असतं का?” असा थेट सवाल मुंबईकर विचारत आहेत.
याचा आर्थिक फटका देखील प्रचंड बसला आहे. केवळ दोन दिवसांतच छोटे व्यापारी, दुकानदार आणि रोजंदारीवर जगणारे मजूर यांना हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागले. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना आजवर झालेल्या नाहीत.
मुंबईकरांचा रोष आता टोकाला पोहोचला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई बुडत राहणार आणि करदात्यांचा पैसा भ्रष्टाचाराच्या खाईतच वाहत जाणार का? हा प्रश्न आज प्रत्येक नागरिक विचारत आहे.