सर्वसामान्यांची स्वप्नपूर्ती करण्याचे काम मुंबै बँक करतेय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून गौरवोद्गार

सर्वसामान्यांची स्वप्नपूर्ती करण्याचे काम मुंबै बँक करतेय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून गौरवोद्गार

प्रतिक्षानगर येथे २ वर्षात सहकार भवन उभारणार भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांची घोषणा

चुनाभट्टी शाखेचा उद्‌घाटन सोहळा संपन्न

मुंबई- मुंबईत अनेक खासगी बँका आहेत. मात्र या सर्व बँकांची उद्दिष्टे नफा कमावणे हेच आहे. परंतु नफ्यासोबत सर्वसामान्य माणसांची स्वप्ने पूर्ण करण्याचे काम मुंबई जिल्हा बँक करतेय, असे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबई बँकेच्या चुनाभट्टी शाखेच्या नवीन कार्यालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी काढले. तर भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी येत्या दोन वर्षात प्रतिक्षानगर येथे सुसज्ज असे सहकार भवन उभारणार असल्याची घोषणा केली.

याप्रसंगी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, विधानपरिषद आ. प्रसाद लाड, सहकारातील ज्येष्ठ नेते व बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, पुरुषोत्तम दळवी, विठ्ठल भोसले, जिजाबा पवार, विष्णू घुमरे, अनिल गजरे, नितीन बनकर, कविता देशमुख, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, कप्तान मलिक, वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष ऍड. आप्पासाहेब देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष सुशम सावंत, राजेश शिरवाडकर, विकासक निलेश कुडाळकर, योगेश केदार, बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम व मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे यांसह मोठ्या संख्येने सहकारातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले कि, मुंबईसारख्या शहरात मुंबई बँकेने ६० पेक्षा अधिक शाखा उघडून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या देशात संसदीय लोकशाही पद्धतीने कारभार चालतो आणि संसदीय लोकशाही कशी चालवावी याची माहिती देशाच्या संविधानातून प्राप्त झाली आहे. याच संविधानात सहकार क्षेत्राला विशेष स्थान देण्यात आलेय. याचा अर्थ हाच आहे कि, संविधान आणि संसदीय लोकशाही पद्धत पुढे नेण्यासाठी सहकार क्षेत्राचे खूप मोठे योगदान आहे. सहकार क्षेत्राला पुढे न्यायचे असेल तर प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्रातील उत्तम उदाहरण मुंबई बँक असल्याचे दिसून येतेय. मुंबई बँकेच्या माध्यमातून लोकांची स्वप्ने पूर्ण होताना दिसत असल्याचेही नार्वेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले कि, मुंबई बँकेने स्वयंपुनर्विकास योजना हाती घेतलीय. या योजनेमुळे गृहनिर्माण संस्थांना विकासकाशी बांधील राहण्याची गरज नाही. हे कौतुकास्पद आहे. आज जिथे टाटा-बिर्ला यांची कार्यालये आहेत त्या शेजारीच मुंबई बँकेचे कार्यालय आहे. भविष्यात मुंबईला मुंबई बँकेच्या माध्यमातून ओळख मिळेल असेही नार्वेकर म्हणाले. खातेदारांची संख्या वाढवणे प्रत्येक बँकेचे ध्येय्य असते. मुंबई बँकेला विधीमंडळातील खाती उघडण्यासंदर्भात जी काही कार्यवाही आहे ती करताना जास्त मेहनत घ्यायला लागणार नाही. योग्य हाती कारभार असल्यामुळे जास्त विचार करायला लागणार नसल्याचा पुनःरूच्चारही नार्वेकर यांनी केला.आ. प्रविण दरेकर यांच्याविषयी बोलताना नार्वेकर म्हणाले कि, प्रविण दरेकर ज्या क्षेत्रात हात घालतात, लक्ष देतात तिथे उन्नतीच होते. आमदार झाले त्यावेळी त्यांनी विधानसभा गाजवली. विधानपरिषदेत सदस्य झाले त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची कारकीर्द सर्वांनीच पाहिलीय. विरोधी पक्षनेता कसा असावा हे त्यांच्या रूपाने आपण पाहिलेय व आता मुंबई बँकेचे संचालक म्हणून अनेक वर्ष ते कार्यरत आहेत. संचालक कसा असावा, मुंबई शहरात बँक कशी चालवावी याचे उत्तम उदाहरण प्रविण दरेकर आहेत, असे गौरवोद्गारही नार्वेकर यांनी काढले.

तत्पूर्वी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी म्हटले कि, आज या शाखेचे उदघाटन होतेय. ज्यावेळी आम्ही संचालक म्हणून आलो तेव्हा काही हजार कोटींचा बँकेचा व्यवसाय होता. आज पंधरा हजार कोटींचा टप्पा बँकेने पार केलाय. अनेक संकटे आली, खोट्या टीका झाल्या परंतु लोकांचा मुंबई बँकेवरील विश्वास किंचितही हलला नाही, हे खरे गमक आहे. अडचणीचा, कठीण काळ असो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागे पहाडासारखे उभे राहिले आहेत. मुंबईत अनेक बँका आहेत. पण ज्यावेळी सर्वसामान्य माणसाला हात द्यायचा असतो त्यावेळी कुणी खासगी बँक पुढे येत नाही. त्यावेळी मुंबई जिल्हा बँक पुढे सरसावते. ही सर्वसामान्यांची बँक आहे. ती मोठी झाली पाहिजे यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत.तसेच विधीमंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ८५० ते ९०० आहे. त्यांची खाती मुंबई जिल्हा बँकेत उघडण्यासाठी आदेश करावा. आम्ही त्यांना चांगली सेवा देऊ. विधिमंडळात २००-२५० स्क्वे. फूट जागा उपलब्ध करून दिली तर आमचे ४-५ कर्मचारी तेथील कर्मचाऱ्यांसाठी कामं करतील, अशी मागणीही दरेकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. स्वयंपुनर्विकास हे माझे स्वप्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला राजाश्रय दिलाय. त्यांनी स्वयंपुनर्विकास योजनेसाठी अनेक महत्वाचे निर्णयही घेतले असून मुंबईत आपण सहकार भवन उभारतोय. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन प्रतिक्षानगर येथे भूखंड दिलाय. तो मुंबई बँकेच्या ताब्यात आला आहे. त्या ठिकाणी १०-१२ मजल्याचे सुसज्ज असे सहकार भवन येणाऱ्या दोन वर्षात उभारणार असल्याची घोषणाही दरेकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *