मनसे–शिवसेनेची महापालिका निवडणुकांसाठी युती जाहीर; मराठी अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा निर्धार – राज ठाकरे

 

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची अधिकृत युती जाहीर करण्यात आली. आज (२४ डिसेंबर २०२५) मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

 

राज ठाकरे म्हणाले की, “कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे,” या भूमिकेतूनच दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. ही युती केवळ जागावाटपासाठी नसून, मराठी माणसाचे मुंबईसह संपूर्ण राज्यातील अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात लढण्यासाठी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

 

युतीतील जागावाटप, किती आणि कुठल्या जागा याबाबतची माहिती सध्या देण्यात आली नसून, योग्य वेळी संबंधित नेते तपशील जाहीर करतील, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, मुंबईचा महापौर हा मनसे–शिवसेना युतीचाच असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल, असा ठाम दावा त्यांनी केला.

 

यावेळी माध्यमांनाही उद्देशून बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आजही अनेक संपादक, पत्रकार आणि माध्यमांतील कर्मचारी हे कट्टर मराठीप्रेमी आहेत. मराठी भाषा आणि मराठी माणसाविरोधातील षड्यंत्र त्यांना मान्य नाही. त्यामुळे यावेळी मालकांची भूमिका न पाहता आपल्या सद्सद्विवेक बुद्धीप्रमाणे मराठी माणसाच्या बाजूने ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

ही दोन पक्षांची लढाई नसून, मराठी माणसाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात जशी माध्यमे मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली, तशीच भूमिका यावेळीही घ्यावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *