मुंबई – बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीशी माझा जवळचा संबंध आहे. २५-३० वर्ष बँकेच्या माध्यमातून या पतसंस्थेला ताकद देणे, मदत करण्याचे काम अविरहितपणे केलेय. या पतसंस्थेला मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून जी मदत लागेल ती केली जाईल, असे आश्वासन भाजपा गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिले.
भाजपा आमदार आणि समृद्धी सहकार पॅनेलचे सर्वेसर्वा प्रसाद लाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार प्रविण दरेकर बोलत होते. याप्रसंगी आ. दरेकर यांच्या हस्ते समृद्धी सहकार पॅनेलचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले कि, सहकारात खऱ्या अर्थाने समृद्धी आणण्याची गरज आहे. देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी धोरण बनवत असताना ‘सहकार से समृद्धी’ केले. त्याच धोरणाची पाठराखण करत प्रसाद लाड यांनी पॅनेलला नावही ‘सहकार समृद्धी’ दिल्याचे दिसते. बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीशी माझा जवळचा संबंध आहे. २५-३० वर्ष बँकेच्या माध्यमातून या पतसंस्थेला ताकद देणे, मदत करण्याचे काम अविरहितपणे केलेय. परंतु ज्या पद्धतीने समृद्धी सर्वसामान्य सभासदांच्या जीवनात येण्याची गरज होती अशा प्रकारचे कुठलेही भरीव काम ज्यांच्या नेतृत्वाखाली ही पतसंस्था होती ते करू शकले नसल्याचेही दरेकर म्हणाले.
तसेच दरेकर पुढे म्हणाले कि, ज्यावेळी मुंबईत हौसिंग फेडरेशनची निवडणूक होती त्यावेळी सहकारात सामोपचाराने एकत्रित निवडणुका लढवू असे उबाठा पक्षाला सांगितले होते. परंतु ते ऐकले नाहीत. परिणामी २१ च्या २१ जागा आमच्या निवडून आल्या व उबाठा चा दयनीय असा पराभव झाला. आताही उबाठा व मनसे अशा प्रकारे निवडणूक लढताहेत. त्यांना सभासदांशी देणेघेणे नाही. महापालिका निवडणूक जवळ आली म्हणून आम्ही एकत्र आहोत, मुंबईकर आमच्या सोबत आहेत अशा प्रकारे राजकीय व्यासपीठ म्हणून ते या निवडणुकीकडे पाहताहेत. मात्र आम्ही राजकीय व्यासपीठ म्हणून निवडणुकीकडे पाहत नाही. आम्ही लोकांना मदत करू शकतो. जिल्हा बँक ही या पतसंस्थेची पालक बँक आहे. या बँकेला लागणारा अर्थपूरवठा करणारी संस्था आम्ही आहोत. अनेक योजना पतसंस्था आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून एकत्रितपणे करण्याचा आमचा मानस आहे. पतसंस्थेला ताकद देण्याचे काम आम्ही करू. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. मात्र त्यांनी कधीच या व्यवस्थेकडे लक्ष दिले नाही. जे बेस्ट कामगारांचे नेतृत्व करत होते त्यांनी फक्त कामगारांना पिळून काढणे एवढेच काम केले, असा आरोपही दरेकर यांनी केला.
निवडणुकीत पाच पांडवांचे पॅनेल
तत्पूर्वी पत्रकार परिषदेला संबोधित करताना आ. प्रसाद लाड यांनी म्हटले कि, सहकार समृद्धी पॅनेलमध्ये समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन श्रमिक उत्कर्ष सभा, एससी/एसटी वेल्फेअर असोसिएशन आणि बहुजन एम्प्लॉईज युनियन असे पाच पांडवांचे पॅनेल असून त्या माध्यमातून सहकार समृद्धी पॅनेल उभे केले आहे. हे पॅनेल माझ्या नेतृत्वात निवडणूक लढवेल, असेही लाड म्हणाले.
बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीत भ्रष्टाचार
आ. लाड म्हणाले कि, या पतपेढीत जितेंद्र चव्हाण व राजेंद्र गायकवाड या तपासणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून २०२१-२२ मध्ये भ्रष्टाचार झाला. लोणावळ्यात बेस्ट पतसंस्थेच्या बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ६-७ बंगले विकत घेतले. त्याची किंमत ६ कोटी होती. त्या काळात १६ कोटी देवून हे बंगले विकत घेतले. तसेच दादर येथे त्यांच्या पतपेढीसाठी कार्यालय विकत घेतले. त्याची किंमत बिल्डरच्या रेडीरेकनरनुसार ४ कोटी होती. ते ९ कोटीला विकत घेतले गेले. २०२१ ते २०२५ या काळात किती बेस्टचे कर्मचारी ड्रायव्हर, कंडक्टर लोणावळ्याच्या बंगल्यावर गेले व किती वेळा तुमच्या पार्ट्या बंगल्यावर झाल्या? हे बंगले पतसंस्थेतील पदाधिकाऱ्यांसाठी घेतले गेले. परंतु त्याचा वापर तुमच्या पार्ट्यासाठी होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो अशा वास्तू तात्काळ विकून त्याचे पैसे डिव्हीदंडच्या माध्यमातून ५०-५० हजार रुपये कर्मचाऱ्यांना वाटले जावे, अशी मागणीही लाड यांनी केली.