मीरा -भाईंदर: ( ५ मार्च) मीरा-भाईंदर शहरात उभारण्यात येत असलेल्या ३ उड्डाणपुलांना अनुक्रमे धर्मवीर आनंद दिघे उन्नत मार्ग, स्वर्गीय रतनजी टाटा उन्नत मार्ग तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उन्नत मार्ग याप्रमाणे महापुरुषांची नावे द्यावीत. अशी मागणी परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी राज्याची उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुंबई शहराच्या वेशीवर वसलेले मीरा-भाईंदर हे नव्याने विकसित होणारे शहर आहे. सध्या या शहराची लोकसंख्या १४ लाख इतकी आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या व त्यामुळे वाढत्या वाहन संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता राज्य सरकारने दिलेल्या वेगवेगळ्या विकास निधीतून महापालिका क्षेत्रामध्ये वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नवे उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत.
या उड्डानपुलांना अनुक्रमे प्लेझेंट पार्क सिग्नल ते सिल्वर पार्क सिग्नल येथील उड्डाणपुलाला धर्मवीर आनंद दिघे उन्नत मार्ग एस.के. स्टोन सिग्नल ते शिवार उद्यान सिग्नल दरम्यानच्या उड्डाणपूलाला स्वर्गीय रतनजी टाटा उन्नत मार्ग तसेच शिवार उद्यान सिग्नल ते गोल्डन नेस्ट सर्कल च्या उड्डाण पुलाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उन्नत मार्ग अशी महापुरुषांची नावे द्यावीत. अशी मागणी शहरातील विविध सामाजिक संघटना, नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी केली होती. त्यानुसार भविष्यात लोकार्पण होणाऱ्या या उड्डाणपुलांना वरील महापुरुषांची नावे द्यावीत अशी विनंती मंत्री सरनाईक यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.