मीरा -भाईंदर, प्रतिनिधी (२ एप्रिल): मीरा -भाईंदर येथे नव्याने उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा व प्रादेशिक परिवहन अधिकारी शुभांगीनी पाटील इतर परिवहन अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना परिवहन विभागाच्या विविध कामासाठी यापूर्वी ठाण्याला जावे लागत होते. मी परिवहन मंत्री झाल्यानंतर मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याबद्दल मी इथल्या जनतेला शब्द दिला होता. त्यानुसार एप्रिल – २०२५ पासून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होत आहे. या कार्यातून नागरिकांना दुचाकी व चार चाकी वाहनाचे परवाने त्याची नोंदणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे यापुढे मीरा-भाईंदर वासीयांना परिवहन विभागाच्या कोणत्याही कामासाठी ठाण्याला जावे लागणार नाही. तरी या कार्यालयाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.