सायबर युगातील व्यवसाय सुरक्षिततेवर एल.एल.आय.एम. मुंबई येथे व्यवस्थापन विकास कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न

 

■ प्रतिनिधी, मुंबई  –  लाला लजपतराय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, महालक्ष्मी, मुंबई यांच्या पुढाकाराने, मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने “डिजिटल युगातील व्यवसाय सुरक्षितता: सायबर धोका व्यवस्थापन आणि डेटा संरक्षण कायदे” या विषयावर व्यवस्थापन विकास कार्यक्रम आज उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता उपस्थितांच्या स्वागताने झाली. यानंतर उद्घाटन सत्रात राष्ट्रगीत, राज्यगीत, संस्थेचे व डीएलएसएचे व्हिडिओ सादरीकरण आणि दीपप्रज्वलनाने वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय अध्यक्ष डॉ. कमल गुप्ता यांच्या मार्गदर्शनात झाले. यावेळी विद्यार्थी समुपदेशक डॉ. आशा अग्रवाल यांचा डॉ. शक्ती अवस्थी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक डॉ. एच. जे. भसीन यांनी स्वागतपर भाषण केले. प्रमुख पाहुणे श्री. सतीश हिवाळे यांच्या प्रेरणादायी भाषणाने कार्यक्रमात सायबर सुरक्षा विषयाची दिशा अधोरेखित झाली. सत्राचे समारोप डॉ. केवल उके यांनी केले.

कार्यक्रमाचे पहिले सत्र “सायबर सुरक्षा व डिजिटल धोका व्यवस्थापन” या विषयावर पार पडले. या सत्रात प्रा. नीता खोब्रागडे, प्रमुख, डिजिटल व सायबर फॉरेन्सिक विभाग, मुंबई शासकीय फॉरेन्सिक विज्ञान संस्थेच्या भाषणाने उपस्थितांना नव्या दृष्टीकोनाची जाणीव करून दिली.

दुसऱ्या सत्रात “एंटरप्राइज सुरक्षा, एथिकल हॅकिंग व सायबर धोका निवारण” या विषयावर श्री. शुभम सावंत यांनी सखोल विवेचन केले. सत्राचे समारोप प्रा. प्रदीप सिंह यांनी केले.

दुपारच्या भोजनानंतर तिसऱ्या सत्रात “डेटा संरक्षण कायदे: अनुपालन व व्यवसाय धोरणे” यावर अ‍ॅड. मोहिनी सूर्यवंशी यांनी अतिशय माहितीपूर्ण व्याख्यान दिले. चौथे सत्र “सीएसआर, सामाजिक प्रभाव आणि स्टार्टअप्ससाठी निधी” यावर आधारित होते. यात श्री. हेमंत सामंत (श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट) हे अध्यक्ष होते. सत्रात श्री. सचिन राल्हान यांचे ऑनलाइन सादरीकरण झाले.

कार्यक्रमाच्या शेवटी समारोप सत्रात दिवसभराचा आढावा, उपस्थितांचे अभिप्राय, प्रमाणपत्र वितरण आणि डॉ. सुरेश सुवर्णा यांचे आभार प्रदर्शन झाले.

एल.एल.आय.एम. व डी.एल.एस.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला हा उपक्रम सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रात व्यवस्थापन विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *