कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे या तीनही महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या तिन्ही ठिकाणी महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाल्याने जनतेच्या कौलानुसारच महायुतीची सत्ता स्थापन केली जाणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर असून, त्यांच्या मुंबईत परतल्यानंतर या संदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत संयुक्त बैठक होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीत या तीनही महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर असावा, याबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीनही महानगरपालिकांमध्ये महायुतीला मिळालेल्या जनादेशाचा आदर राखत, सत्तास्थापना आणि महापौर पदावर महायुतीचाच उमेदवार विराजमान होईल, असा ठाम विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे.