प्रभाग क्रमांक ०३ मधून महायुतीचे उमेदवार
प्रकाश दरेकर प्रचंड मताधिक्क्याने विजयीकार्यकर्त्यांच्या अपार कष्टामुळे हा विजय
विजयी रॅलीत आ. प्रवीण दरेकरांचे प्रतिपादन
मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक ०३ चे उमेदवार प्रकाश दरेकर यांचा जवळपास चार हजार मतांच्या फरकाने मोठा विजय झाला आहे. विजयानंतर प्रभाग क्रमांक ०३ मधून प्रकाश दरेकर यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. हा विजय कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार कष्टामुळे झाला असल्याचे प्रतिपादन यावेळी भाजपा गटनेते व कॅबिनेट मंत्री आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.
या विजयी मिरवणुकीत भाजपा गटनेते व कॅबिनेट मंत्री आमदार प्रवीण दरेकर, माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, शिवसेना शाखाप्रमुख प्रकाश पुजारी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, मंडल अध्यक्ष अमित उतेकर, वॉर्ड अध्यक्ष निकेश तळेकर, रमेश आंबोरे, ललित शुक्ला यांसह मोठ्या संख्येने पुरुष व महिला पदाधिकारी सहभागी झालेहोते.
विजयी मिरवणुकीत संबोधीत करताना आ. प्रवीण दरेकर म्हणाले की, गेली १०-१२ दिवस कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले त्यामुळे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार प्रकाश दरेकर प्रचंड मतांनी विजयी झाले. हा विजय कार्यकर्त्यांचा, बाळकृष्ण ब्रीद, शिवसेना, राष्ट्रवादी यांचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मुंबईकरांनी, महाराष्ट्रातील जनतेने विश्वास व्यक्त केला आणि त्या विश्वासावर मुंबईचा विकास आता महायुती करू शकेल हे मुंबईकरांनी दाखवून दिले. मुंबईचा विकास होईलच परंतु प्रभाग क्रमांक ०३ हा सर्वात चांगला विभाग होईल, असा शब्द दरेकरांनी विजयी रॅली प्रसंगी दिला.
तसेच येथील जनतेला वाटले पाहिजे मी नगरसेवक आहे, ज्या कार्यकर्त्यांनी काम केले त्याला आज आनंद वाटतोय की मी नगरसेवक झालोय तोच आनंद पाच वर्ष त्यांना मिळाला पाहिजे याची काळजी प्रकाश दरेकर यांनी घ्यावी, असेही आ. दरेकरांनी सूचित केले. यावेळी आ. प्रवीण दरेकर यांनी केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांचे मार्गदर्शन, मागाठाणे विधानसभेचे आ. प्रकाश सुर्वे यांचे सहकार्य आणि ज्यांनी या विजयात मोलाचा वाटा उचलला त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.