महाड (मिलिंद माने) महाड एम.आय.डी.सी. मध्ये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे थातूरमातूर सोपस्कार पार पाडले जाते मात्र तरी देखील नाल्यातील पाणी रस्त्यावर येवून साचत असल्याचे दिसून येत आहे. गटारांची सफाई न झाल्याने गटारे तुंबून पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. अंतर्गत रस्त्यावर साचलेले पाणी आणि पडलेले खड्डे यामुळे प्रतिवर्षी केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
. महा औद्योगिक वसाहती मध्ये प्रतिवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर महाड औद्योगिक क्षेत्रातील गटारे साफसफाईचा आणि रस्ता दुरुस्तीचा ठेका काढला जातो. मात्र ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी केल्याचे भासवले जाते. पाऊस सुरु होताच गटार सफाई सोडून दिली जाते. गेली कित्येक वर्ष अशाच प्रकारे ठेकेदाराकडून कामे करून घेतली जात आहेत. पावसाचा मुहूर्त शोधून खड्डे भरण्यास सुरवात केली जाते आणि पाऊस सुरु होताच पावसाचे कारण देवून खड्डे भरणे आणि गटार सफाईचे काम सोडून दिले जाते. यामुळे औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत भागात असलेल्या गटारांची सफाई झाली नाही.
ऐन पावसाळ्यात गटारात गवत आणि माती तशीच पडून राहिल्याने हि गटारे तुंबली आहेत. पाणी सुरळीत वाहून जात नसल्याने गटारे तुंबून गटारातील पाणी रस्त्यावर येत आहे. महाड एम.आय.डी.सी.मधील गटार दुरुस्ती आणि देखभालीकरिता वार्षिक निविदा तत्वावर ठेका दिला जातो. मात्र यावर्षी या कामाच्या देखभालीकडे ठेकेदार आणि प्रशासनाने कानाडोळा केला. यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावर येवून थांबत आहे. गटारातील रसायनमिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्याने कारखान्यात ये जा करणाऱ्या कामगारांना देखील यातून चालणे आरोग्यास धोकादायक ठरत आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी गटारे कचऱ्याने भरली गेली आहेत यामुळे पाणी पुढे सरकत नसल्याने हे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. महाड एमआयडीसी मध्ये गटारांप्रमाणेच खड्ड्यांची अवस्था देखील तशीच आहे.
औद्योगिक क्षेत्रात विविध भागात देखील खड्डे पडले असून त्यात साचून राहणाऱ्या पाण्यामुळे या खड्ड्यांचा विस्तार अधिकच वाढू लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर खड्डे भरण्याचे थातूरमातूर काम केले जाते आणि ठेकेदारांचा खिसा भरला जातो. यामुळे नागरिकांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. अशा ठेकेदारांकडून हि कामे काढून घेतली पाहिजेत अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र राजकीय पुढाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी नेमण्यात आलेले ठेकेदार औद्योगिक वसाहतीचे प्रशासन बदलणार नाही ही क***** दगडावरची रेघ आहे
महाड एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यांवरून चालणे देखील कठीण झाले आहे. अवजड वाहतूक सुरू असल्याने डांबरी रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे कामगारांच्या छोट्या वाहनांना आणि दुचाकी चालवताना वाहन चालकांना त्रास होत आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याचे काम ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांनी करून घेणे अपेक्षित होते. मात्र एमआयडीसी मधील सुस्त अधिकाऱ्यांमुळे अंतर्गत रस्त्यांचे वाटोळे लागले आहे. यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाच्या नावाने बोंबाबोंब असताना आता औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे व गटारांचे देखील वाटोळे करण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रशासनातील अधिकारी करीत असून शासनाचे लाखो रुपये वाया जात असताना औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अधिकारी डोळ्यावर काळी पट्टी बांधून का गप्प आहेत असा असावा औद्योगिक वसाहती परिसरातील या रस्त्यावरून ये जा करणारे ग्रामस्थ व कंपनीमध्ये जाणारे कामगार प्रशासनाला विचारत आहेत