संभाव्य दरडजन्य स्थितीमुळे महाड भोर पंढरपूर रस्ता वाहतुकीसाठी बंद, वरंधा घाटाची दुरुस्ती किती काळ चालणार ?

 

 

महाड (मिलिंद माने) महाड वरून पुण्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी.डी राजेवाडी ते वरंधा भोर महाड या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू असून पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन या महामार्गावरील वाहतूक तीन महिने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुणे यांनी काढले आहेत मात्र हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित कधी होईल असा सवाल या परिसरातील नागरिक व वाहतूकदार शासनाला विचारत आहेत.

महाड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा महाप्रळ भोर पंढरपूर या रस्त्याचे रुंदीकरण गेली दोन वर्षापासून सुरू आहे. वरंधा घाट आणि पुणे जिल्हा हद्दीतील रुंदीकरणाचे काम मागील तीन वर्षापासून चालू आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहतूकदार तसेच एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. यामुळे या मार्गावर सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असतात. त्यातच महाड हद्दीमधील पारमाची, माझेरी, गावाजवळ रस्ता देखील खचला आहे. २०२१ मध्ये याठिकाणी रस्ता वाहून गेला होता. नैसर्गिक दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन ऐन पावसाळ्यात हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतात.

पुणे जिल्हाधिकारी यांनी १६ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रिका नुसार. राष्ट्रीय महामार्ग ९६५. डी.डी राजेवाडी ते वरंधा भोर महाड हा मार्ग १/६/२०२५ पासून २८/९/२०२५ या कालावधीत वाहनांच्या वाहतुकी करता पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्हा व पुणे जिल्हा हद्दीतील रुंदीकरणाच्या कामामध्ये अनेक भाग दरड प्रवण क्षेत्र असल्याने नैसर्गिक आपत्ती होऊन दरड कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी व जीवित हानी होण्याचा धोका उद्भवू शकतो म्हणून १/६/२०२५ ते दिनांक ३१/९/२०२५ या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड मध्यम वाहनांच्या वाहतुकीसाठी वरंधा घाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हवामान खात्यावर निर्णय अवलंबून?

पावसाळ्याच्या कालावधीत हवामान खात्याने रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट दिला नसल्यास सदरचा घाट रस्ता हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला ठेवणे योग्य राहील असे देखील या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे मात्र अपघात टाळण्याच्या दृष्टीने वाहतुकीसाठी १२/६/२०२५ ते दिनांक ३१/९/२०२५ या कालावधीत बंद करण्यात येत आहे असे देखील स्पष्ट केले आहे. या कालावधीमध्ये या रस्त्यावरून जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव निजामपूर ताम्हणी घाट मुळशी पिरंगुट पुणे तर कोल्हापूर कडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर सातारा कराड कोल्हापूर अथवा राजेवाडी फाटा पोलादपूर खेड चिपळूण पाटण कराड कोल्हापूर अशा पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकंदरीत वरंधा घाट पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडीमुळे सातत्याने बंद केला जात आहे यामुळे रायगड जिल्हा हद्दीतील व पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हद्दीतील अनेक गावातील स्थानिक रहिवाशांच्या जाण्या येण्याचा मार्ग बंद झाल्याने या मार्गावरून स्थानिकांच्या रोजी रोटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांसहित दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना याबाबत काहीच देणे घेणे नसल्याचे या दोन जिल्ह्यातील रहिवाशांचे म्हणणे आहे हा मार्ग मागील तीन वर्षापासून सातत्याने बंद असल्याने या मार्गावरून पुणे व रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या देखील बंद झाले आहेत परिणामी स्थानिक रहिवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे याबाबत शासन खरोखरच जागरूक आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *