वसईविरार -नायगाव पूर्व, चिंचोटी फाटा येथील इंडियन ऑईल पंपाशेजारी असलेल्या ‘अमित ढाबा’मध्ये गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर दारू विक्री, ग्राहकांची फसवणूक आणि कायद्याचे उघडपणे उल्लंघन सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. स्थानिक नागरिक व समाजसेवकांच्या तक्रारीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ जुलै रोजी अचानक छापा टाकून धडक कारवाई केली.
या कारवाईत मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई), ६८ आणि ८४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांवरही कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १६३/२०२५ दिनांक ०१/०७/२०२५ रोजी दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध अड्ड्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या जागरूकतेने आणि कायद्याच्या कडक अंमलबजावणीनेच अशा गोरखधंद्यांना आळा बसू शकतो, असा जनतेचा विश्वास आहे.