कोकण कट्ट्याकडून ‘माणुसकीच्या भिक्षाफेरी’द्वारे साई आधार संस्थेला मदतीचा हात!

विरार, (प्रमोद तरळ): विलेपार्ले येथील ‘कोकण कट्टा’ संस्थेने यंदा नवव्या वर्षीही आपल्या ‘माणुसकीची भिक्षाफेरी’ उपक्रमातून विरार येथील निराधार मुलांसाठी कार्यरत असलेल्या साई आधार संस्थेला २००० किलो तांदूळ आणि डाळीचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. श्री स्वामी समर्थ मठ, विलेपार्ले यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे.

साई आधार संस्था निराधार मुलांना ‘घरपण’ देण्याचे महत्त्वाचे कार्य करते. या मदतीच्या निमित्ताने कोकण कट्ट्याच्या सदस्यांनी विशाल परुळेकर यांच्या या आश्रमात प्रत्यक्ष भेट दिली.

याशिवाय, बालग्राम पनवेल आणि सह्याद्री संस्था, देवबांध येथेही लवकरच अन्नधान्य पुरवले जाणार आहे.

या प्रसंगी कोकण कट्ट्याचे संस्थापक अजित पितळे, मार्गदर्शक जगन्नाथ गावडे, खजिनदार सुजित कदम, विवेक वैद्य, प्रथमेश पवार, प्रभाकर खेडेकर, मनिष माईन, निशी मोरे, सचिन माने, आणि अथर्व मुरमुरे यांची उपस्थिती होती.

या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्तींनीही हातभार लावला. उदय कौलकर यांनी मुलांना पेन भेट दिली, तर रवी तांबे यांनी मुलांसाठी सकाळच्या अल्पोपाहाराची व्यवस्था केली. तसेच, संजय कदम यांनी मुलांना केक भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला.

‘कोकण कट्टा’ गेली नऊ वर्षे सातत्याने अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असून, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत आहे. त्यांच्या ‘माणुसकीची भिक्षाफेरी’ या उपक्रमामुळे अनेक निराधार मुलांना आधार मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *