मिरा रोड – मीरा भाईंदर महापालिका प्रभाग क्रं ६ मध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम करून बियरबार व लॉज बनविण्यात आलीआहेत. केम छो बार व मेमसाब बारच्या अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी मिराभाईंदर महापालिका प्रशासक/आयुक्त संजय काटकर यांच्या सूचनेवरून प्रभाग क्र.६ चे प्रभाग अधिकारी यांनी केम छो बार व मेमसाब बार/लॉजच्या अनधिकृत बांधकामाबाबत काशिमीरा पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. .
मीराभाईंदर शहरात अनेक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. काही बांधकामावर प्रभाग अधिकाऱ्याकडून तात्पुरती दिखाव्याची कारवाई केली जाते तर काही अनधिकृत बांधकाम करणाऱ्याशी संगनमत करून कारवाई करण्यास मनपा अधिकाऱ्याकडून टाळाटाळ केली जाते. पुण्यामध्ये झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील अनेक अनधिकृत बांधकाम केलेल्या बियर बार व लॉज वर तोडक कारवाई केली होती. त्या कारवाई दरम्यान, काशिमिरा येथील राष्ट्रीय महामार्गावरील काही ऑर्केस्ट्रा बार आणि लॉजच्या अनधिकृत बांधकामांवर देखील कारवाई करण्यात आली. मात्र बेकायदा बांधकाम तोडल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून एमआरटीपी कायद्यांतर्गत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याचा गैरफायदा घेत या बेकायदेशीर ऑर्केस्ट्रा बार व लॉजच्या मालक, चालकांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने तोडलेली बांधकामे पुन्हा उभारली होती. याबाबत प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रारी वाढल्यावर तसेच वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी या अनधिकृत बांधकामावर २९ ऑगस्ट रोजी पुन्हा जेसीबीच्या साह्याने तोडक कारवाई केली. परंतू त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तोडण्यात आलेले बांधकाम करण्यात आले. त्यानंतर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बार चालक, मालकावर एमआरटीपी कायद्यान्वये तात्काळ गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रभाग समिती क्रमांक ६ चे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात केम छो बारचा चालक दिनकर हेगडे याच्याविरुद्ध एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी बारचे खरे मालक किरण मकवाना यांचे नाव गुन्ह्यामध्ये टाकले नसून त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे तसेच मेमसाब लॉजच्या टेरेसवर तिसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केले आहे. हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी महापालिका अधिकारी काही दिवसापूर्वी गेले असता त्यांना वरिष्ठांकडून फोन आल्याने कारवाई न करताच पुन्हा माघारी हाताने परतावे लागले. त्यामुळे कारवाई करु नये यासाठी राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचे सांगितले जात आहे. या लॉजवर कारवाई करण्याच्या होत असलेल्या मागणीमुळे मेमसाब लॉजचे जागा मालक व भोगवटा धारक अब्दुल करीम एम. मोहम्मद शेख यांच्याविरुद्ध एमआरटीपी कायद्याअंतर्गत काशिमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनधिकृत बांधकाम धारकावर गुन्हा दाखल केला असला तरी मेमसाब बार/लॉजच्या तिसऱ्या मजल्याच्या वाढीव अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई झाली नसल्यामुळे सामाजिकसंघटना व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यातयेत असून लवकरात लवकर मेमसाब लॉजच्या तिसऱ्यामजल्याच्या अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी करण्यात येत आहे. मिराभाईंदर महापालिका प्रशासक संजय काटकर आता काय भुमिका घेतात याकडे मिराभाईंदरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे .