मुंबई : मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये शिवसेनेच्या मुंबईतील २९ नवनिर्वाचित नगरसेवकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व नगरसेवकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
“मुंबईकरांनी मोठ्या विश्वासाने तुम्हाला निवडून दिले आहे. आता तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमच्या प्रभागात बदल दिसलाच पाहिजे,” असा ठाम आदेशवजा सल्ला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. छोटे-मोठे कामसुद्धा नागरिकांच्या लक्षात आले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभागात काम करताना स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या. निधीचा काटेकोर वापर करत रखडलेले प्रश्न मार्गी लावा, असा सल्ला देताना त्यांनी इमारतींची ओसी, पुनर्विकासाचे प्रश्न तातडीने हातात घ्यावेत, असेही स्पष्ट केले.
विरोधकांशी संघर्ष न करता गोड बोलून त्यांनाही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्या. शिवसेनेची प्रतिमा मलीन होईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडू नये, याची खबरदारी घ्या, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. प्रभागातील कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना सरचटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.