मुंबई – अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधान परिषदेतील सभागृहात अर्धा तास चर्चेवर बोलताना भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी म्हटले की, ग्रामविकास विभागातील कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नतीबाबत शासनाने अधिसूचना काढली आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ग्राम विकास विभाग हा ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत महत्वाचा विभाग आहे. कनिष्ठ सहाय्यक हे पद ग्रामीण जनतेसाठी महत्वाचे पद आहे. ग्रामपंचायत कामकाज असेल, रेकॉर्ड ठेवणे, माहिती गोळा करणे आणि आवश्यक कागदपत्रे तयार करणे, हे काम त्यांच्याकडे असते. जन्म-मृत्यू नोंदणी, मालमत्ता कर यांच्या नोंदी ठेवण्याच्या कामावर परिणाम झालेला आहे. ग्रामपंचायत बैठकांची तयारी करणे, बैठकांचे इतिवृत्त तयार करणे. ग्रामस्थांच्या तक्रारी व समस्या ऐकून घेणे, ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची नोंद ठेवणे, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे हिशोब ठेवणे, शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे, या सर्व कामांवर परिणाम झाला आहे. कनिष्ठ सहाय्यक हा ग्रामविकासाच्या कामात एक महत्त्वाचा दुवा आहे. ग्राम विकास मंत्र्यांनी विशेष लक्ष घालून ज्या पाच जिल्ह्यात रिक्त पदे आहेत ती भरावीत, अशी विनंती दरेकर यांनी केली. यावर सकारात्मक उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी २६ जिल्ह्यात कारवाई पूर्ण झालेली आहे. ५ जिल्ह्यात जी कारवाई अपूर्ण आहे ती येणाऱ्या तीन महिन्यात पूर्ण केली जाईल, असे म्हटले.