मुंबई: प्रो गोविंदा 2025 स्पर्धेत जय जवान गोविंदा पथकाला संधी न मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला असून, आयोजकांवर राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जय जवान पथकाने काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात थर लावून सलामी दिली होती. त्यामुळे हीच सलामी त्यांना नडली का, असा सवाल सध्या मुंबई आणि उपनगरातील गोविंदा मंडळांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्या आयोजकत्वात होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत, जय जवान पथकाचे रजिस्ट्रेशन १० जून रोजी दुपारी १२:०४ वाजता झाले होते, जे काही सेकंदांनी वेळेच्या बाहेर गेले. आयोजकांनी याच आधारावर त्यांना स्पर्धेबाहेर ठेवले असून, वेबसाईट स्लो असल्यामुळेच विलंब झाला, असा जय जवान पथकाचा दावा आहे. विशेष म्हणजे, याच वेळेस नोंदणी केलेल्या अन्य दोन पथकांना संधी मिळाली, परंतु जय जवानला वगळण्यात आले, हे पक्षपाती निर्णय असल्याचे व्यवस्थापक विजय निकम यांनी सांगितले. दरम्यान, आयोजकांनी हे आरोप फेटाळून लावत जय जवान पथकाने वेळेत नोंदणी केली नाही, त्यामुळे त्यांना संधी देता आली नाही, असे स्पष्ट केले आहे. 7 ते 9 ऑगस्टदरम्यान वरळी डोम येथे होणाऱ्या स्पर्धेत 32 पथकांना संधी देण्यात आली असून, गतवर्षीचे उपविजेतेसुद्धा यंदा स्पर्धेबाहेर राहिले आहेत, असे आयोजकांचे म्हणणे आहे.