मुंबई | प्रतिनिधी : मुंबई गुन्हे शाखा कक्ष-२ ने कांदिवली (पूर्व) येथील दोन बनावट कंपन्यांवर छापा टाकून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला असून, या कारवाईत एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी डी.जी. सर्च कन्सलटन्सी आणि प्रिरीत लॉजिस्टिक प्रा. लि. या बनावट कंपन्यांवर छापा टाकला. या ठिकाणी बँकांचे नवीन बचत व करंट खाती, पासबुक, चेकबुक, ई-मेल आयडी, पासवर्ड आणि सिमकार्ड मिळवून ते अॅक्टिवेट करून देशभर सायबर फसवणुकीसाठी पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आहे.
१२ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या कारवाईत वैभव पटेल, सुनिलकुमार पासवान, अमनकुमार गौतम, खुशबु संदराजुळा आणि रितेश बांदेकर यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडून २ लॅपटॉप, १ प्रिंटर, २५ मोबाईल, २५ पासबुक, ३० चेकबुक, ४६ एटीएम कार्ड, स्वाईप मशीन आणि १०४ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.
पोलिस तपासात समोर आले की आरोपी हे बँक डिटेल्स अंदाजे ७-८ हजार रुपयांना विकत घेत आणि ती खाती अॅक्टिवेट करून सायबर फसवणूक रॅकेटला पुरवत. लॅपटॉप तपासणीत तब्बल ९४३ बँक खात्यांचा डेटा सापडला असून त्यापैकी १८१ खाती सायबर फसवणुकीसाठी वापरली गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
सायबर हेल्पलाईन १९३० वर आलेल्या ३३९ तक्रारींपैकी मुंबईतील १४, महाराष्ट्रातील १२ आणि इतर राज्यांतील ३३ गुन्हे नोंदवले गेले आहेत. या रॅकेटमुळे देशभरात एकूण ₹६०.८२ कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, यामध्ये केवळ मुंबईत ₹१.६७ कोटी आणि महाराष्ट्रात ₹१०.५७ कोटींचा समावेश आहे.
या प्रकरणी ६७/२०२५ नुसार भादंवि कलम ३१८(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम,अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे , पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-दक्षिण, दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर व त्यांच्या पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
अधिक माहिती किंवा सायबर फसवणूकबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.