मुंबई – १०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ पुन्हा ताकदीने कशी पुढे येईल यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल, असा विश्वास यावेळी भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
मतदानाच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. प्रविण दरेकर यांनी या विजयाचे श्रेय मतदार, सहकार कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासाला दिले. ते म्हणाले की, सहकार पॅनेलच्या २१ पैकी २० जागा निवडून आल्या आहेत. ही निवडणूक कार्यकर्त्यांनी लढवली. राज्यात इतिहास घडला आहे. राज्य सहकारी संघाला वैभवशाली परंपरा आहे. १०६ वर्षाचा इतिहास आहे. संघाला उर्जीतावस्था आणायची आहे. शिक्षण निधी, शिक्षकांच्या पगारांचे विषय आहेत. राज्य सहकारी संघाला पुन्हा वैभवाचे दिवस कसे येतील, पूर्वीचे गतवैभव कसे मिळेल यासाठी प्रयत्नशील राहू. या निवडणुकीत सहकार पॅनलने सिद्ध केले की राज्यातील सहकारी चळवळीला नवे नेतृत्व आणि दिशा मिळू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र सरकारही सहकार क्षेत्रासाठी कटिबद्ध आहे. या निवडणुकीत सहकार पॅनेलला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. त्या यशाला, विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही. येणाऱ्या काळात सहकार, शिक्षण-प्रशिक्षण अभियान मोहीम सुरु करू. संघाच्या विकासासंदर्भात चांगल्या संकल्पना घेऊन नवीन संचालक मंडळ काम करेल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. तसेच या दणदणीत विजयाबद्दल सहकार पॅनेलच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत आमदार प्रवीण दरेकर यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. या विजयामुळे राज्य सहकारी संघाला नव्या युगाची सुरुवात मिळाली असून, सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.
विजयी अपक्ष उमेदवाराचा
सहकार पॅनेलला पाठिंबा
सहकार पॅनेलचे २१ जागांपैकी ९ उमेदवार या आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित १२ पैकी १० जागा एकहाती निवडून आणत आणि अपक्ष विजयी उमेदवार प्रमोद पिपरे यांनी पाठिंबा देत सहकार पॅनेलने एकूण २० जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
*सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार*
१) आमदार प्रविण दरेकर, मुंबई विभाग
२) हिरामण सातकर, पुणे विभाग
३) धनंजय कदम (शेडगे), कोल्हापूर विभाग
४) संजय पाटील, नाशिक विभाग
५) अरुण पानसरे, कोकण विभाग
६) गुलाबराव मगर, औरंगाबाद विभाग
७) विलास महाजन, अमरावती विभाग
८) अशोक जगताप, विभागीय सहकारी संघ प्रतिनिधी
९) प्रकाश दरेकर, राज्य स्तरीय संघीय संस्था प्रतिनिधी
१०) संजीव कुसाळकर, इतर संस्था प्रतिनिधी
११) रामदास मोरे
१२) नितीन बनकर
१३) सुनील जाधव-पाटील
१४) नंदकुमार काटकर
१५) विष्णू घुमरे, अनुसूचित जाती-जमाती
१६) अनिल गजरे, भटक्या विमुक्त जाती-जमाती
१७) अर्जुनराव बोरुडे, इतर मागास प्रवर्ग
१८) जयश्री पांचाळ, महिला प्रतिनिधी
१९) दिपश्री नलावडे, महिला प्रतिनिधी