जनआंदोलनातून निवडणूक रिंगणात; प्रभाग २३ मध्ये उमेश शिंदेंचा परिवर्तनाचा नारा

 

मीरा-भाईंदर : प्रतिनिधी – २०२५ मधील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाईंदर पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून वंचित बहुजन आघाडीने (VBA) तरुण, आक्रमक कार्यकर्ता उमेश शिंदे यांना उमेदवार म्हणून जाहीर केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

 

उमेश शिंदे हे गेल्या काही वर्षांपासून जनआंदोलनांच्या माध्यमातून मिरा भाईंदर मध्ये सक्रिय आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात महापालिकेसमोर केलेले ‘लोटांगण आंदोलन’, थोर महापुरुषांच्या स्मारकांच्या स्वच्छतेसाठी राबवलेले ‘भीक मागो आंदोलन’, तसेच चर्मकार समाजाच्या कामगार व स्टॉलधारकांवरील अन्यायाविरोधात उघडपणे भूमिका घेणे — अशा विविध आंदोलनांत त्यांनी ठाम सहभाग नोंदवला आहे.

दरम्यान, विद्यमान नगरसेवकांविरोधात प्रभाग २३ मधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या पाच वर्षांत मूलभूत समस्या — रस्ते, पाणी, स्वच्छता, गटारे — यांकडे दुर्लक्ष झाले असून नगरसेवक निवडणुकीच्या काळातच दिसतात, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर उमेश शिंदे यांना अनेक नागरिक ‘प्रामाणिक, साधे आणि जनतेत राहणारे नेतृत्व’ म्हणून पाहत आहेत. तरुण चेहरा, रस्त्यावर उतरून प्रश्न मांडण्याची तयारी आणि जनतेशी थेट संवाद ही त्यांची ताकद मानली जात आहे.

प्रभाग २३ मधील ही निवडणूक आता जुन्या, निष्क्रिय नेतृत्वाविरोधातील जनतेच्या असंतोषाचे आणि नव्या नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षांचे प्रतीक ठरत असल्याचे चित्र आहे. परिवर्तनाच्या या लढतीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *