मुंबई – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वतीने पुनर्विकसित करण्यात आलेल्या बीडीडी चाळीतील ५५६ सदनिकांचे चावी वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगलप्रभात लोढा, ॲड. आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार मिलिंद देवरा, आमदार सुनील शिंदे, कालिदास कोळंबकर, सचिन अहिर, महेश सावंत, माजी आमदार सदा सरवणकर, किरण पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन सातत्याने कार्यरत आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील या ५५६ सदनिकांचे वितरण ही या स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे. २०-२५ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी सरकारने थेट म्हाडामार्फत काम करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आधुनिक सुविधांसह जागेचा सर्वोत्तम वापर, सौरऊर्जा, पावसाच्या पाण्याचा निचरा व कचरा व्यवस्थापन यांचा समावेश करण्यात आला आहे.”
मुख्यमंत्रीांनी पुढे सांगितले की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रकल्पाचा दुसरा आणि डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून, वरळीतील सर्व बीडीडी चाळ वासियांना नवे घरे मिळणार आहेत. “ही घरे केवळ बांधकाम नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठी सोन्यासारखी गुंतवणूक आहे. हा ठेवा पुढच्या पिढीला द्यायचा आहे, त्यामुळे कोणीही ही घरे विकू नयेत,” असे आवाहनही त्यांनी केले.
पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घरांचा दर ५० लाखांवरून फक्त १५ लाख करण्यात आला असून, त्यांनाही हक्काची घरे मिळणार आहेत. अभ्युदयनगर, जीटीबी नगरसह जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे कामही सुरू आहे.
धारावीबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, “१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या धारावीला एक ‘नवीन शहर’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. येथील सर्व रहिवाशांना पात्र ठरवून घरे देण्यात येतील. याशिवाय, धारावीतील व्यवसायांना पुढील पाच वर्षे कर सवलती मिळणार असून, धारावी ही औद्योगिक वसाहत म्हणून विकसित करून स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना दिली जाणार आहे.