मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, मीरा-भाईंदर शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात संघटनशक्तीचे जोरदार प्रदर्शन करत निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय मिळवण्याचा संकल्प करण्यात आला. या मेळाव्यास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार नरेंद्र मेहता, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, माजी जिल्हाध्यक्ष रवि व्यास यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार नरेंद्र मेहता म्हणाले, “व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो.” कार्यकर्त्यांनी ‘कमळ’ केंद्रस्थानी ठेवून काम केल्यास वैयक्तिक स्वार्थ बाजूला राहतो आणि राष्ट्रनिर्माणाचा मार्ग मोकळा होतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “कमळ फुललं तर आपण सगळे फुलू” हा संदेश देत घराघरात कमळ पोहोचवण्याचा संकल्प केल्यास भाजपचा महापौर आणि पूर्ण बहुमत निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मीरा-भाईंदरमध्ये झालेल्या विकासकामांचे श्रेय नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाला देत भाजपच्या धोरणांमुळे शहराचा कायापालट झाल्याचे सांगितले. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने मैदानात उतरून उमेदवारांच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना बूथ पातळीवर मजबूत बांधणीचे महत्त्व पटवून दिले. २०१४ नंतर केंद्र व राज्यातील भाजप सरकारने मेट्रो विस्तार, कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू यांसारखी ऐतिहासिक विकासकामे केली असल्याचा उल्लेख त्यांनी केला. “बूथ जिंका, निवडणूक जिंका” या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रानुसार प्रत्येक प्रभागात ५१ टक्के मतांचे लक्ष्य साध्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जनकल्याणकारी योजनांचे लाभार्थी घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी दररोज १० ते १२ तास काम करण्याचा निर्धार करावा, असे सांगितले.
कार्यकर्ता मेळाव्यात “एक विचार, एक ध्येय, एक संघटन” या घोषणांनी वातावरण दणाणले. हजारोंच्या उपस्थितीने भाजप कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत, अंतर्गत मतभेद विसरून केवळ ‘कमळा’साठी काम करणे हीच आपली ओळख असल्याचा ठाम संदेश दिला, अशी माहिती शहर मीडिया प्रभारी बिपिन गुप्ता यांनी दिली.