मुंबई- भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक ०३ चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या प्रचारार्थ आज दहिसर येथील केतकीपाडा येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन मी सांगतो ‘मी रोज खात असतो दोन अंडी, या निवडणुकीत मी उडवणार आहे ठाकरे बंधूची दांडी’, अशी शेरोशायरी करत ठाकरे बंधूची खिल्ली उडवली.
याप्रसंगी भाजपा गटनेते व कॅबिनेट मंत्री आ. प्रवीण दरेकर, प्रभाग क्रमांक ०३ चे उमेदवार प्रकाश दरेकर, माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, माजी महापौर शुभा राऊळ, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, रमेश आंबोरे, मोतीभाई देसाई, सागर पवार, हसीना शेख, वैष्णवी पुजारी, अभिजीत गायकवाड, कृष्णकांत दरेकर, सुवर्णा सकपाळ, ललित शुक्ला, संदीप शिंदे, प्रभाकर कांबळे, सागर भालेराव, निकेश तळेकर, चंद्रकांत कांबळे, सतिश ढगे यांसह महायुतीचे पुरुष व महिला पदाधिकारी, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच कवितेच्या माध्यमातून केली. ते म्हणाले की, जागी झाल्यामुळे मुंबईची नारी महायुती जिंकणार आहे १५ जानेवारी. केतकीपाड्यातील जनता येथे आली आहे सारी, नगरसेवक पदावर प्रकाश दरेकरांचीच आहे बारी. मंचावर आहे एक प्रवीण आणि दोन आहेत प्रकाश त्यामुळे मला दिसतेय निळे निळे आकाश. मोदी करताहेत देशाचा विकास म्हणूनच महाराष्ट्रात महाविकास आघाडी झालीय भकास. प्रवीण दरेकर आहेत देवेंद्र फडणवीस यांचे खास व प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदे यांचे खास. या दोघांचेही हे दोघे आहेत खास कारण त्यांच्यासोबत आहे रामदास. अनेकवेळा रेल्वेने जायचो तेव्हा रिक्षावाले उभे असायचे. ते पैसे न घेता मला सोडायचे. केतकी पाड्यातील जनता पाठीशी उभी राहायची. तुम्ही पाठीशी नसता तर दिल्लीपर्यंत जाता आले नसते. मोदींच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री बनण्याची मिळालीय संधी. मंत्री बनलो. बाबासाहेबांचा आशीर्वाद नसता तर संधी मिळाली नसती. त्यांचे विचार घेऊन मी सांगतो मी रोज खात असतो दोन अंडी, या निवडणुकीत मी उडवणार आहे ठाकरे बंधूची दांडी. महायुतीतून उद्धव ठाकरे बाहेर गेले. एकनाथ शिंदे, प्रकाश सुर्वे सोबत आले. कारण प्रकाश सुर्वे आहेत खणखणीत नाणे त्यांचा मतदारसंघ आहे मागाठाणे.

आठवले पुढे म्हणाले की, काँग्रेस सोबत राहून उपयोग नाही हे माझ्या लक्षात आले. म्हणून मी काँग्रेस सोडून मोदींसोबत आलो. जनतेने मला संवेदना दिली. लढल्यामुळे मी ताकदवान झालो. प्रकाश दरेकर हे आ. प्रवीण दरेकर यांचे भाऊ आहेत. त्यांचे कार्य चांगले आहे. केतकीपाड्यावर डोंगरावर पाणी देण्यासाठी प्रयत्न त्यांनी केला. वन जमिन कुणाची असो ती भारताची आहे. आम्ही येथून हटणार नाही. गावाहून आलेले लोकं येथे पोट भरतात. कायदा आम्हालाही माहित आहे. परंतु तो माणसाच्या कल्याणासाठी असायला हवा. जगण्याचा आम्हालाही अधिकार आहे. २०२० च्या झोपड्यांना मान्यता द्यावी अशी मागणीही आठवले यांनी दरेकर व सुर्वे यांच्याकडे केली.
आठवले पुढे म्हणाले की, ही महायुती मजबूत आहे. रिपब्लिकन आहे तुमच्यासाठी. महायुतीची मुंबईत सत्ता येणार. उद्धव ठाकरेंचे स्वप्न उध्वस्त होणार. राज ठाकरेंना सोबत घेतल्याने त्यांना मतं मिळणार नाहीत. त्यांना मतदानातून दाखवून द्यावे लागणार आहे की आम्ही उत्तर भारतीय आहोत पण प्रथम भारतीय नागरिक आहोत .मुंबईत राहण्याचा आम्हालाही अधिकार आहे. प्रत्येकवेळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे बोलतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेकांनी बलिदान दिले. मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही. बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांची युती होती. एवढी वर्ष सोबत होता तेव्हा मुंबई तुटू शकली नाही. तर आज कशी तुटेल. महाराष्ट्रापासून मुंबई कुणी तोडू शकणार नाही. जर महाराष्ट्रापासून मुंबईला कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ठोकण्याचे काम आम्ही करू, असा विश्वासही आठवले यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, आपला झोपडपट्टीतील घराचा प्रश्न आहे. फुकट असले तरी आम्ही तेथे राहतोय. ही स्कीम शरद पवारांच्या मंत्रिमंडळात असताना समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना आणली. दरेकर यांना प्राधिकरणाचे अध्यक्ष केलेय. जुन्या इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर ती विकासकाला न देता स्वतः बांधायची. हे सरकार जनतेचे, झोपडपट्टीतील माणसाला न्याय देणारे आहे. खा. पियुष गोयल मंत्री आहेत. तुम्हाला येथून कुणीही हातावणार हटविणार नाही. राहत्या जागीच तुमचे पुनर्वसन करू, यासाठी दिल्लीला बैठक घेऊ. आम्ही १२ ठिकाणी लढतोय कारण आम्हाला ठाकरे बंधुचे आणि महाविकास आघाडीचे बारा वाजवायचे आहेत. १५ जानेवारीला कमळाचे बटण दाबा आणि प्रकाश दरेकरांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही आठवले यांनी केले.
तत्पूर्वी आ. दरेकर संबोधित करताना म्हणाले की, राज्यात देवाभाऊंचे, एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे. महापालिकेतही महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. विरोधक निवडणूक कशासाठी लढवताहेत हाच खरा प्रश्न आहे. येथे काम प्रकाश सुर्वे, मी आणि महायुतीचे सरकार करतेय. दुसरे काँग्रेसचे उमेदवार आहेत. काँग्रेसचा हात हळूहळू गायब होत चालला आहे. विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत पानिपत झाले. स्वतःचे पानिपत झाले ते दुसऱ्यांना पाणी काय पाजणार, अशी कोपरखळीही दरेकरांनी लगावली. तसेच लोकांना चांगला पर्याय महायुतीच्या माध्यमातून प्रकाश दरेकर लाभलेत. त्यांनी ज्या पद्धतीने प्र. क्र. ५ चा विकास केला त्यापेक्षा दुपटीने प्र. क्र. ३ चा विकास करतील यासाठी येथील विजय दैदीप्यमान व प्रचंड असला पाहिजे, असे आवाहनही दरेकरांनी केले. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्या चवदार तळ्याला अडीच कोटी लक्षवेधी मांडून मी दिले. सिद्धार्थ महाविद्यालयासाठी १४ कोटी दिले. येथील प्रवेश द्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करायचाय. दलितांसाठी काम करायचेय. सर्वांनी ताकदीने महायुतीसाठी काम करा, विरोधकांचे डिपॉझीट जप्त करून मुंबईत महाविजय केतकीपाड्यातील जनतेने दिलाय अशा प्रकारचा विक्रम करा, अशी विनंतीही दरेकरांनी उपस्थित जनतेला केली.
केतकीपाड्यातील महिलांनाही व्यवसायासाठी १ लाखापर्यंत कर्ज देऊ
दरेकर पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणींना सरकारने दीड हजार रुपये दिले. पण तुम्हाला लखपती दीदी बनविण्याचे काम मी करून दाखविलेय. हे स्वप्न नाही प्रत्यक्षात उतरवलेय. ५०० महिलांना आतापर्यंत एक लाखाचे बिनव्याजी कर्ज मुंबई बँकेच्या माध्यमातून दिलेय. केतकीपाड्यातील महिलांनाही व्यवसायासाठी एक लाखापर्यंत कर्ज देऊ, असा विश्वासही दरेकरांनी दिला.