■ प्रतिनिधी, मुंबई (लोअर परळ) दि. २९ मार्च: सेनापती बापट मार्गावरील मीनाताई फुल मार्केटजवळ एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने टॅक्सीला जोरदार धडक दिली, यात टॅक्सीचालक आणि महिला प्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची भीषणता अंगावर काटा आणणारी असून, परिसरातील नागरिकांमध्ये मोठा संताप आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी एलफिन्स्टन पुलावर दुभाजकाचा अभाव आणि वाहनांच्या अधिक वेगामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचे बोलले जात आहे. या मार्गावर वाहतुकीची गैरव्यवस्था, अकार्यक्षम गतिरोधक, रंबलर्सचा अभाव आणि दुहेरी पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून, राजकीय पाठबळामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अभय मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
हा अपघात ज्या परिसरात घडला तिथे अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. लाखो कर्मचारी दररोज या मार्गाने प्रवास करतात. मात्र, आज शनिवार असल्याने रस्त्यावर वर्दळ तुलनेने कमी होती. याच मोकळ्या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन चालवण्याच्या धाडसाचे भीषण परिणाम झाले. चुकीच्या दिशेने वाहन चालवणे आणि वेगमर्यादा ओलांडणे यामुळे मुंबईतील रस्ते मृत्यूच्या सापळ्यात बदलत चालले आहेत. प्रशासन आणि वाहनचालक कधी जबाबदारी स्वीकारणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.