मुंबई | प्रतिनिधी – मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत पुन्हा एकदा आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक विशेष उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच मुख्य सचिवांसह अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान सध्याच्या आंदोलकांच्या मागण्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा, तसेच पुढील धोरणात्मक निर्णयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबईत काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरू असले तरी, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासन सतर्क असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.
राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, सरकारवर त्वरित निर्णय घेण्याचा दबाव वाढत चालला आहे.