मुंबई : मुंबईच्या किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल ₹474.64 कोटींचा विक्रमी विमा संरक्षण मिळवले असून, हा भारतातील कोणत्याही सण-उत्सवासाठी आजवर घेतलेला सर्वाधिक विमा आहे.
“नवसाला पावणारा विश्वाचा राजा” म्हणून ओळखली जाणारी आणि “सोन्याचा गणपती” म्हणून प्रसिद्ध असलेली मंडळाची महागणपती मूर्ती यावर्षीही भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. ही मूर्ती 69 किलो सोने, 336 किलो चांदी आणि भक्तांनी दिलेल्या अन्य मौल्यवान प्रसादांनी सजलेली आहे.
या विम्यात सर्व जोखीम संरक्षण, आग व विशेष धोका, सार्वजनिक दायित्व, वैयक्तिक अपघात कव्हर तसेच ठिकाणावरील संकट धोरणाचा समावेश आहे. फर्निचर, फिक्स्चर, सीसीटीव्हीपासून स्वयंसेवक व सुरक्षारक्षकांपर्यंत प्रत्येक बाबीचे संरक्षण या विमा योजनेत करण्यात आले आहे.
यंदाचा गणेशोत्सव फक्त पाच दिवसांचा असणार असून विराट दर्शनाचा पहिला लूक 25 ऑगस्ट रोजी रात्री आठनंतर होणार आहे. मुख्य उत्सव 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वेळीही लाखो भक्त मंडळाच्या महाप्रसाद व अन्नदान सेवेत सहभागी होणार आहेत. केळीच्या पानांवर पारंपरिक पद्धतीने भोजन देण्याची परंपरा कायम ठेवली जाणार आहे.
पर्यावरणपूरक उपक्रमांवर यावर्षी विशेष भर देण्यात आला आहे. शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंगांचा वापर, प्लास्टिक निर्मूलन, डिजिटल सेवा कियोस्क, QR-कोड ऑफरिंग आणि नेट-शून्य उत्सर्जन पद्धतींद्वारे ‘गो ग्रीन’ मिशन राबवले जाणार आहे.
सुरक्षेसाठी 875 कर्मचारी, 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, एआय-आधारित फेशियल रेकग्निशन प्रणाली आणि मेटल डिटेक्टर गेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वंचित मुलांसाठी शैक्षणिक मदत, ऋग्वेद परंपरेवर आधारित वैदिक विधी आणि डिजिटल सुविधा हे विशेष उपक्रम म्हणून राबवले जात आहेत.
जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अमित डी. पै म्हणाले,
“भक्तांच्या सुरक्षेची खात्री करणे आणि गणेशोत्सवातील प्रत्येक पैलू सुरक्षित करणे ही आमची प्रमुख जबाबदारी आहे. भगवान महागणपतीच्या दैवी कृपेने, आम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे.”
हजारो भाविकांच्या उपस्थितीत जीएसबी सेवा मंडळाचा गणेशोत्सव 2025 हा श्रद्धा, परंपरा, सांस्कृतिक भक्ती आणि पर्यावरणपूरक भव्यतेचा खऱ्या अर्थाने दिव्य अनुभव ठरणार आहे.