पुणे, दि. २५: पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती-जमातींच्या लाभार्थ्यांना संकरीत, देशी गायी व दुधाळ म्हशींचे गट वाटप योजनेंतर्गत सन २०२४-२०२५ मध्ये ४ हजार ७१४ लाभार्थ्यांना ६३ कोटी ३८ लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
राज्याच्या दूध उत्पादनामध्ये वाढ करण्याबरोबरच ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना अर्थाजनाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत २०२४-२०२५ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ३ हजार ८१० लाभार्थ्यांना ५१ कोटी २२ लाख रुपये तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील ९०४ लाभार्थ्यांना १२ कोटी १६ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर २ दुधाळ संकरीत, देशी गायींचा किंवा म्हशींचा गट तीन वर्षाच्या विम्यासह देण्यात येतो. गायीची प्रकल्प किंमत १ लाख ५६ हजार ८५० रुपये आहे. त्यामध्ये पशुधनाची किंमत १ लाख ४० हजार व १६ हजार ८५० रुपये विम्याची रक्कम आहे. तर म्हशीची प्रकल्प किंमत १ लाख ७९ हजार २५८ रुपये असून त्यापैकी पशुधनाची किंमत १ लाख ६० हजार असून विम्याची रक्कम १९ हजार २५८ रुपये आहे. पशुधनाच्या प्रकल्प किंमतीमध्ये २५ टक्के हिस्सा लाभार्थ्यांने भरावयाचा असून ७५ टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते.
*लाभार्थी निवडीचे निकष व आवश्यक कागदपत्रे:*
लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्प, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील असावा. तसेच एकूण लाभार्थ्यांमध्ये ३ टक्के दिव्यांग व ३० टक्के महिला लाभार्थी असतील. अर्जासोबत छायाचित्र ओळखपत्राची सत्यप्रत, दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला, ७/१२ व ८ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ८, प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत, जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाची नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रत, अपत्य दाखला आदी कागदपत्र जोडणे आवश्यक राहील.
ही योजना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांचेमार्फत राबविण्यात येत असून लाभार्थी निवड AH-MAHABMS या ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे करण्यात येते. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.