गिरगावातील पागडीच्या जागा, सेस इमारतींसह बेनामी मालमत्तेबाबत सरकार धोरण बनविणार
मुख्यमंत्र्यांचा शब्द! आ. प्रविण दरेकरांची माहिती
गिरगावमधील पुनर्विकासाचा प्रस्ताव
अधिवेशनात मांडणार
मुंबई- दक्षिण मुंबईत गिरगाव परिसरात पागडीची घरे, सेसच्या इमारती आणि बेनामी मालमत्ता आहेत. यासंदर्भात येणाऱ्या काही दिवसांत धोरण बनवावे लागले तरी राज्य सरकार बनवेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगावकरांना दिला असल्याची माहिती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिली. तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात गिरगाव येथील पुनर्विकासाचा प्रस्ताव मांडून गिरगावकरांना न्याय मिळवून देईन, असा विश्वासही आ. दरेकर यांनी यावेळी दिला.
गिरगाव येथील बेडेकर सदन इमारतीच्या पटांगणात मुंबई सहकारी बोर्ड लि. आणि मुंबई जिल्हा बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वयंपुनर्विकास’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन आ. प्रविण दरेकरांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मनसे नेते राजा चौगुले, अरविंद गावडे, मुंबई सहकारी बोर्डाचे सचिव श्रीधर जगताप, शिबिरातील वक्ते उदय दळवी, हर्षद मोरे, नंददीप सोसायटीचे सचिव घनश्याम सोमपुरा, अमोल खरात यांसह मोठ्या संख्येने गिरगावकर नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले कि, स्वयंपुनर्विकासाची संकल्पना मुंबईत गती घेतेय. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई बँकेत मी स्वयंपुनर्विकासाचे धोरण तयार केले. गृहनिर्माण संस्था मुंबई बँकेच्या सभासद आहेत त्यांना कर्ज देणे हे बँकेचे कर्तव्य आहे आणि कर्ज घेणे त्यांचा अधिकार आहे. धोरण तर बनवले, पैसे देण्याची तयारीही दाखवली. परंतु या योजनेला राजाश्रय नसता, सरकारने पाठबळ दिले नसते तर आज स्वयंपुनर्विकास पुढे जाऊ शकला नसता.
गोरेगावला नेस्को येथे गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. जवळपास १५ हजार सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते. स्वयंपुनर्विकासासाठी १८ मागण्या त्यांनी केल्या होत्या. त्यापैकी १६ मागण्यांचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्रीवर चार तास मॅरेथॉन बैठक घेऊन स्वयंपुनर्विकासासाठी सवलती, एक खिडकी, सुलभ प्रक्रिया करण्याचे काम त्यांनी केले. अजूनही अनेक अडचणी आहेत. त्याही सोडविणार आहोत कारण लोकांचा या योजनेवर विश्वास बसलाय.
आमच्या बँकेकडे कर्जासाठी १६०० प्रस्ताव आलेत. त्यापैकी ३६ सहकारी संस्थांना कर्ज दिले असून त्यातील १२ इमारती उभ्या राहिल्या आहेत. येत्या २५ फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चारकोप येथे श्वेतांबरा सोसायटीने स्वयंपुनर्वीकसित केलेल्या इमारतीतील लोकांना चावी वाटप करण्यात येणार आहे. अद्भुत असे काम स्वयंपुनर्विकासाचे मुंबईत सुरू आहे. त्याचे पडसाद गिरगांवात उमटत आहेत याचा आनंद असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच गिरगावातील पागडीच्या जागा, सेस इमारती व बेनामी मालमत्ता याची लेखी माहिती तयार करून माझ्या पर्यंत पोहोचवावी, मी ती सरकारकडे मांडेल. सुदैवाने अधिवेशन पुढील महिन्यात आहे. या विषयाचा प्रस्ताव मी स्वतः अधिवेशनात मांडेन आणि गिरगावकर, पागडीच्या जागेत राहणाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असा विश्वासही दरेकरांनी दिला.
गृहनिर्माण क्षेत्रात चमत्कार करणारे स्वयंपुनर्विकास हे अभियान आहे. राज्य सहकारी बँकेने या योजनेसाठी दीड हजार कोटी व नॅशनल को. ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून स्वयंपुनर्विकास प्रकल्पाला निधी देण्यात येणार आहे. जेव्हा आपला उद्देश चांगला असतो तेव्हा मदतीचे हात पुढे येत असतात. या योजनेला मुख्यमंत्र्यांचा प्रचंड आशीर्वाद आहे. केवळ मुख्यमंत्री पाठीशी आहेत म्हणूनच अशा प्रकारचे धाडस मुंबई शहरात करता आलेय. ‘देवाभाऊंचे पाठबळ हेच स्वयंपुनर्विकासाचे बळ ‘, असे अभियान मुंबईत सुरू असल्याचेही दरेकरांनी म्हटले.