मुंबई | प्रतिनिधी : गणेशोत्सवाला यंदा राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्राबाहेर मराठीबहुल असणाऱ्या पाच ठिकाणी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सवाची परंपरा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक वारसा साजरा केला जाणार आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि एकात्मतेचा प्रचार व प्रसार हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट ठरणार आहे.या उपक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांबाबत माहिती देताना सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक ऐक्याचा महत्त्वपूर्ण सोहळा आहे. या कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधवांना मातृभाषेच्या आणि संस्कृतीच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा आस्वाद घ्यावा.”