मुंबई (प्रविण वराडकर)- मुंबईतील ताडदेव परिसरातील वेलिंग्डन सोसायटीत कायदेशीररीत्या राहणाऱ्या रहिवाशांना महानगरपालिकेकडून बेघर करण्यात येणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रहिवाशांमध्ये असलेल्या अनिश्चिततेवर अखेर दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीत त्यांनी वेलिंग्डन सोसायटीला भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळण्यासाठी आणि रहिवाशांना बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी सविस्तर चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत,
“गणेशोत्सव काळात कोणत्याही कायदेशीर रहिवाशांना त्रास होऊ नये,” असे स्पष्ट निर्देश दिले.
या निर्णयामुळे वेलिंग्डन सोसायटीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,
“गणपती बाप्पा मोरया… विघ्नहर्ता आमच्या मदतीला आला!” अशा भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या.
गोरेगाव पश्चिम, राम मंदिर येथील RNA एक्झोटीका प्रकल्प, जो १५ वर्षांपासून रखडला आहे, त्यात अडकलेल्या ३०० पेक्षा अधिक फ्लॅट खरेदीदारांबाबतही या बैठकीत चर्चा झाली.
गोपाल शेट्टी यांनी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला असून,
या प्रकरणात फ्लॅट धारकांना लवकरात लवकर हक्काची घरे मिळावीत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.
या निर्णयामुळे मुंबईतील असंख्य रहिवाशांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासनाच्या या तत्परतेमुळे “गणपती बाप्पा… विघ्न टळलं!” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.